

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : जेम्स कॅमरुन या दिग्दर्शकाने 'द टर्मिनेटर', 'टायटॅनिक' आणि 'अवतार' या चित्रपटांमुळे जगभरातील सिनेरसिकांच्या मनात आपले अढळ स्थान बनवलेले आहे. आता त्यांच्या बहुप्रतिक्षित 'अवतार २ : द वे ऑफ वॉटर'चा टीझर रीलिज झाला आहे. हा चित्रपट १६ डिसेंबरला मोठ्या पडद्यावर झळकेल. भारतात हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सॅम वर्थिंग्टन, स्टीफन लँग, केट विन्सलेट आणि वीन डिझेल यांचा समावेश आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर'चा पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभर सुमारे २० हजार कोटी रुपयांची कमाई केली होती.
तब्बल १३ वर्षांनी या चित्रपटाची नवी अपडेट समोर आली आहे. 'अवतार' चित्रपटाच्या सिक्वेलचे अधिकृत शीर्षक जाहीर झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत होते. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेला हा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमरुनच्या 'अवतार'च्या सिक्वेलला 'अवतार: द वे ऑफ वॉटर' असे नाव देण्यात आले आहे.
'अवतार २'चा १ मिनिट ३८ सेकंदांचा ट्रेलर प्रेक्षकांना पँडोराच्या अद्भुत जगाची झलक दाखवतो. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, ज्यामध्ये समुद्र आणि त्यात राहणारे प्राणी खास भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये सॅम वर्थिंग्टन आणि जो सल्डाना आपापल्या भूमिकेत दिसत आहेत. यावेळी ते त्यांच्या कुटुंबासह दिसणार आहेत.
अवतारच्या सिक्वेलमध्ये जेक सुली आणि त्याचे कुटुंबीय पँडोराचे इतर भाग एक्सप्लोअर करतात. दरम्यान जेकला मुलं बाळं झालेली असतात. परंतु, जे संकट त्यांनी दूर केले असतं ते पृथ्वीवरचं संकट पुन्हा त्यांच्यासमोर येऊन ठाकले आहे. या सगळ्यांशी जेक आणि पँडोराचे लोक कसा लढा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अवतार २ चा ट्रेलर जरी आता प्रदर्शित झाला असला तरी चाहत्यांना यासाठी आणखी सात महिने वाट पहावी लागणार आहे. अवतार जगभरात १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला जरी अवकाश असला तरी प्रेक्षकांना ३ डी आणि इतर वेगवेगळ्या माध्यमातून हा चित्रपट पाहता येणार आहे.
अवतार २ जरी १३ वर्षानंतर प्रदर्शित होणार असला तरी पुढच्या चित्रपटांसाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागणार नाही. दिग्दर्शक आणि निर्माते जेम्स कॅमरुन यांनी या चित्रपटाचे पुढील ३ भाग बनवले असून दर दोन वर्षांनी हे चित्रपट प्रदर्शित होणार आहे.