Salman Khan : ईद निमित्ताने चाहत्यांना झाली सलमान खानची आठवण | पुढारी

Salman Khan : ईद निमित्ताने चाहत्यांना झाली सलमान खानची आठवण

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) आणि ईद (Eid 2022) यांच खास नातं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार व प्रोडक्शन हॉऊस हे एखाद्या सण उत्साहाचे औचित्य ठेऊन आपला चित्रपट प्रदर्शित करीत असतात. तसेच अभिनेता सलमान खान हा दर ईदला आपला चित्रपट प्रदर्शित करत असतो. यंदा मात्र त्याने ईदच्या निमित्ताने आपला नवा सिनेमा प्रदर्शित केला नाही. अर्थात सध्या तो त्याच्या आगामी ‘टायगर ३’ च्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पण, ईदच्या निमित्ताने तमाम सिनेरसिकांना सलमान खानची आठवण सतावत आहे. तसेच दुसरीकडे ईदच्या निमित्ताने सलमानचा कोणताही चित्रपट नसल्याने बॉक्स ऑफिसचे कलेक्शन ऐन उन्हाळ्यात थंड पडल्याचे पहायला मिळाले.

सलमान खानचा (Salman Khan) एक डायलॉग आहे, ‘मैं दिल में आता हूं, समझ नहीं’ अर्थात हा त्याचा डायलॉग आहे, पण ईदच्या दिवशी त्याला मिळणार्‍या प्रेमातून हे अनेकवेळा खरे ठरले आहे. पण भाईजानने २०२२ च्या ईदला चित्रपट प्रदर्शित केला नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर शांतता आहे. ईदच्या निमित्ताने अजय देवगण (Ajay Devgan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांनी आपापले चित्रपट प्रदर्शित केले. परंतु, हे दोन्ही चित्रपट भाईजानच्या एकाही चित्रपटाच्या ओपनिंगला टक्कर देऊ शकले नाहीत. या सर्व स्थितीचा फायदा मात्र केजीएफ २ (KGF 2) ला झाल्याचे पहायला मिळाले.

ईदच्या दिवशी सलमान खानच्या चित्रपटांनी पहिल्या दिवसाची कमाई (Salman Khan)

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ईदला रिलीज झालेल्या सलमान खानच्या चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिले आहे. त्यावर एक नजर टाकूया. २०१०: दबंगची कमाई १४.५० कोटी रुपये, २०११: बॉडीगार्डची कमाई २१.६० कोटी रुपये, २०१२: एक था टायगरची कमाई ३२.९३ कोटी रुपये, २०१४: किकने २६.४० कोटी रुपयांची कमाई केली, २०१५ : बजरंगी भाईजान २७.२५ कोटी रुपये कमावले. २०१६ : सुलतानने ३६.५४ कोटी रुपयांची कमाई केली, २०१७ : ट्यूबलाइटने २१.१५ कोटी रुपयांची कमाई केली, २०१८ : रेस ३ ने २९.१७ कोटी आणि २०१९ : भारतने ४२.३० कोटी रुपयांची कमाई केली.

अजय देवगण आणि टायगर श्रॉफचे चित्रपट ठरले फ्लॉप

अजय देवगणने ईदच्या निमित्ताने ईदच्या आधीच्या शुक्रवारी २९ मे रोजी ‘रनवे ३४’ (Runway 34) चित्रपट प्रदर्शित केला. अजय देवगण यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाकडे साफ दुर्लक्ष केलं आणि हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोसळला. ‘रनवे ३४’ चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन ३ कोटी रुपये होते. त्यामुळे सुरुवात खूपच वाईट झाली. तसेच मागील चार दिवसात या चित्रपटाने फक्त १४.७५ कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी टायगर श्रॉफने ‘हिरोपंती २’(Heropanti 2) हा अॅक्शन चित्रपट आणला. पण, या चित्रपटाची सुद्धा काही अशीच अवस्था होती. पहिल्या दिवशी टायगरच्या चित्रपटाने फक्त ६.२५ कोटींची कमाई करू शकला. तसेच मागील चार दिवसात या चित्रपटाने फक्त १७.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे ईदच्या निमित्ताने अजय देवगन आणि टाइगर श्रॉफ या दोघांच्या चित्रपटांनी एकत्र मिळून सुद्धा सलमान खानचा करिश्मा करु शकले नाहीत.

साऊथच्या चित्रपटांचा बोलबाला

साऊथच्या चित्रपटांच्या निमित्ताने बॉलिवूडला धोक्याची घंटा ऐकू येत आहे. कोणताही सण, उत्सव अथवा स्पेशल डे असं काही गृहीत न धरता साऊथचे सिनेमे प्रदर्शित होतात आणि ते विक्रमी गल्ला जमवत आहेत. कोरोना महामारी काहीशी कमी झाल्या झाल्या अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सध्या ‘केजीएफ २’ हा सिनेमा अजून कमाई करतो आहे. या तिन्ही सिनेमांनी विक्रमी गल्ला जमावला आहे. तसेच त्यांनी हिंदी भाषेत आणि हिंदी पट्ट्यामध्ये जे बॉलिवूडच्या चित्रपटांना जमू शकत नाही अशी कामगिरी करुन दाखवली आहे. दुसरीकडे या चित्रपटांसमोर जे बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले ते अपयशी ठरत आहेत. त्यामुळे बॉलिवूडवर साऊथ चित्रपटांच्या भितीचे सावट पसरत आहे.

Back to top button