संस्कृत असावी राष्ट्रभाषा! – कंगना रणौत | पुढारी

संस्कृत असावी राष्ट्रभाषा! - कंगना रणौत

दक्षिणेत हिंदीला होणारा विरोध हा जुनाच आहे. अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप आणि बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांचा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ट्विटरवर वाद झाला होता. या वादात राजकीय नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी उडी घेतली. आता कंगना रणौतनेही याबाबत आपले मत मांडले आहे. ‘धाकड’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यावेळी तिला कुणीतरी याबाबत विचारले असता ती म्हणाली, आपला देश विविधतेने, विविध भाषांनी आणि विविध संस्कृतींनी नटलेला आहे. प्रत्येकाला आपली भाषा, संस्कृतीचा अभिमान वाटणे साहजिकच आहे. मात्र, आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी एक समान धागाही हवा आहे. संविधानाचा आदर राखला गेला पाहिजे. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. मात्र, तामिळ भाषा तर हिंदीपेक्षाही जुनी आहे आणि संस्कृत तर त्याहूनही जुनी आहे. मला असे वाटते की आपली राष्ट्रभाषा ही संस्कृत असली पाहिजे. याचे कारण म्हणजे आपल्या देशातील सर्व भाषा या संस्कृतमधूनच निर्माण झालेल्या आहेत. मात्र, संस्कृत सोडून हिंदीला राष्ट्रभाषा का बनवले याचे उत्तर माझ्याकडे नाही. हे त्यावेळी घेतलेले निर्णय आहेत. सध्या इंग्रजी ही भाषा संवादाचा दुवा बनली आहे. इंग्रजी ही एकात्म भाषा असावी का? की हिंदी, संस्कृत आणि तामिळ ही जोडणारी भाषा असावी? हे आपण ठरवायचे आहे!’

Back to top button