

पुढारी ऑनलाईन
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून सध्या 'पुष्पा ः द राईज'चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याची फॅन फॉलोविंगही वाढली आहे; पण अल्लूच्या कुटुंबात चित्रपट इंडस्ट्रीत काम करत असलेला आणि सुप्रसिद्ध असलेला तो एकमेव नाही. त्याच्या कुटुंबातील जवळपास 10 जण चित्रपट इंडस्ट्रीत असून त्या सर्वांची स्वतःची अशी ओळख आहे.
अल्लू अर्जुनचे आजोबा अल्लू रामलिंगय्या अभिनेते होते. त्यांनी हजारहून अधिक चित्रपट केले आहेत. त्यांना पाच मुले. त्यातील अल्लू अरविंद आणि सुरेखा यांना चांगली ओळख मिळाली. पैकी अल्लू अरविंद म्हणजे अल्लू अर्जुनचे वडील. ते देखील दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतले मोठे नाव असून ते निर्माता आहेत.
अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू शिरिष देखील अभिनेता आहे. 2013 मध्ये 'गौरवम'मधून त्याने पदार्पण केले होते. अभिनेता चिरंजीवी हे अल्लू अर्जूनच्या आत्याचे पती आहेत. सुरेखा या चिरंजीवीच्या पत्नी. चिरंजीवीचा मुलगा अभिनेता रामचरण तेजा हा अल्लू अर्जूनचा आतेभाऊ आहे. तर चिरंजीवीचा भाऊ पवन कल्याण देखील तेलगू सुपरस्टार आहे.
चिरंजीवीचा आणखी एक भाऊ नागेंद्रबाबू निर्माता, अभिनेता आहे. नागेंद्रबाबू यांचा मुलगा वरूण तेजा देखील अभिनेता आहे. तर नागेंद्रबाबूची मुलगी निहारिका कोनिडेला ही देखील अभिनयात सक्रिय आहे. ती टी.व्ही.वरही काम करते. तर चिरंजीवीची बहीण विजयदुर्गाचा मुलगा साई धरम तेजा देखील अभिनेता आहे. साईचा भाऊ वैष्णव तेजा देखील अभिनेता आहे. अल्लू अर्जुनच्या कुटुंबातील हे एवढे लोक चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत.