लता मंगेशकर : मेरा साया... : सचिन तेंडुलकर | पुढारी

लता मंगेशकर : मेरा साया... : सचिन तेंडुलकर

लतादीदी या माझ्यासाठी मातृतुल्य होत्या. त्यामुळं त्यांच्याविषयी जेव्हा जेव्हा मला काही विचारलं जायचं, तेव्हा मी नेहमी हेच म्हणायचो की, ‘आईविषयी काय बोलायचं! ती आई आहे यातच सगळं सामावलेलं आहे.’ आज ही माँ तिच्यावर प्रेम करणार्‍या माझ्यासारख्या अब्जावधी जणांना सोडून गेल्याचं दुःख शब्दांतून व्यक्‍त होणारं नाही.

मला गानसंगीताची मनापासून आवड आहे. साहजिकच गायनाची आवड असणार्‍या प्रत्येकासाठी लतादीदी या अग्रस्थानी असतात. त्यांच्या स्वरांबद्दल मी काय बोलावं? पण त्यांच्या गाण्यांचा मी दिवाना आहे. लहानपणापासून मी त्यांची गाणी ऐकत आलो आहे. मला आठवतंय, पूर्वी माझ्याकडे वॉकमन होता. त्यानंतर सीडी प्‍लेअर आले. एमपीथ्री प्‍लेअर आले. आता आयपॅड वापरतो. ही सारं माध्यमं किंवा साधनं काळानुरूप बदलत गेली; पण या सर्वांमध्ये भरून राहिलेला कायम स्वर हा लतादीदींचा होता. जीवनातील सुख-दुःखाच्या, आनंदाच्या किंवा उदासीच्या, प्रत्येक मूडमध्ये मी त्यांचीच गाणी ऐकली आहेत.

त्यामुळेच एका भेटीमध्ये मी त्यांना म्हणालो होतो की, ‘तुम्ही वर्षानुवर्षांपासून माझ्या ‘सायलेंट कम्पॅनियन’ आहात.’ त्यांचे शुभाशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिले आहेत. मैदानावरच्या माझ्या प्रत्येक चांगल्या कामगिरीनंतर दीदी फोन करून माझं अभिनंदन करायच्या आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही द्यायच्या. मी निवृत्तीचा निर्णय घेतलेलाही त्यांना रुचला नव्हता. त्यांना खूप वाईट वाटले होते. मी अजून खेळत राहावं, अशी त्यांची इच्छा होती.

मध्यंतरी मी माझ्या नव्या घरामध्ये शिफ्ट झालो. तेव्हा माझी अशी मनापासून इच्छा होती की, माझ्या म्युझिक रूममध्ये लतादीदींनी वापरलेली एखादी वस्तू ठेवण्याची. तेव्हा त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या ‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा’ या गाण्याच्या ओळींची फ्रेम दिली होती. मीही त्यांना माझी एक जर्सी दिली होती, ज्यावर त्यांच्या प्रेमाप्रती आदरभाव लिहिले होते. आम्ही जेव्हा विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं व्यासपीठांवर एकत्र यायचो, तेव्हा मी त्यांना गाणं गाण्याची शिफारस केल्यानंतर त्या ‘तू जहाँ जहाँ…’ हे गाणं आवर्जून गायच्या. आजही त्यांचे ते स्वर माझ्या कानात, मनात रुंजी घालतात. त्यांच्या जाण्यानं माझी ममत्वाची सावली हरपली आहे.

Back to top button