SLvsIND 3nd ODI : क्लीन स्वीपचे लक्ष्य

SLvsIND 3nd ODI : क्लीन स्वीपचे लक्ष्य
Published on
Updated on

कोलंबो ; वृत्तसंस्था : श्रीलंकेविरुद्ध तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यापूर्वी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर संघ निवडीचा पेच असेल. (SLvsIND)

भारतीय संघाचा प्रयत्न या लढतीत विजयाची नोंद करीत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा असेल. त्यामुळे संघात बदल करायचा की गेल्या दोन लढतीतील संघ कायम ठेवायचा यावर संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला सामना सात विकेटस्ने जिंकला. तर, दुसर्‍या लढतीत भारताने तीन विकेटस्ने विजय नोंदवला. ज्यामध्ये दीपक चहरने 69 धावांची नाबाद खेळी केली. (SLvsIND)

भारतीय संघ डावाची सुरुवात शिखर धवन आणि पृथ्वी शॉसोबत करतो की, देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळते हे पाहावे लागेल. शॉने दोन लढतीत 43 आणि 13 धावा केल्या आहेत. शॉला पुन्हा संधी मिळाल्यास त्याला मोठी खेळी करावी लागेल.

आक्रमक फलंदाज इशान किशनला संघात कायम ठेवावे की, संजू सॅमसनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी द्यावी याबाबत संघ व्यवस्थापनाला निर्णय घ्यावा लागेल. मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादव यांचे मध्यक्रमातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे.

हार्दिक पंड्याला फिटनेसबाबत कोणतीही अडचण नसल्याचे उपकर्णधार भुवनेश्वर कुमार याने सांगितले आहे त्यामुळे हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल सामना खेळतील. संघ व्यवस्थापन खेळाडूंच्या कार्यभारावर देखील लक्ष ठेवून असेल. कारण, श्रीलंकेच्या वातावरणात त्यांना 12 दिवसांत सहा सामने खेळायचे आहेत.

गेल्या दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेच्या अनुभवहीन फलंदाजी फळीला नियंत्रित करण्यात यश मिळाले. भुवनेश्वर कुमार भारताच्या आक्रमणाचे नेतृत्व करेल. तर, त्याची साथ देण्याकरिता नवदीप सैनी किंवा चेतन सकारियाला दीपक चहरऐवजी संघात स्थान मिळू शकते.

चहरने गेल्या सामन्यात केलेल्या फलंदाजीमुळे टी-20 मालिकेसाठी त्याचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे त्याला आराम दिला जाऊ शकतो. फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी पहिल्या दोन सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑफ स्पिनर कृष्णप्पा गौतम आणि राहुल चहर यांची प्रतीक्षा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे श्रीलंकेचा संघ दुसर्‍या लढतीत विजयाच्या जवळ पोहोचल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे या लढतीत त्यांचा चांगल्या कामगिरीचा प्रयत्न असेल. सलामी फलंदाज अविष्का फर्नांडोने चांगली कामगिरी केली असून, त्याला इतर फलंदाजांकडून चांगल्या साथीची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news