

शिकागो : प्रचंड जिजीविषा (जगण्याची इच्छा) आणि उत्साह यामुळे अनेक लोक अगदी उतारवयातही आनंदात असतात. याउलट काही लोकांचे नेत्र वयाची चाळिशी गाठली, तरी पैलतीराला लागतात व त्यांचा जगण्याचा उत्साह कमी होतो. अशा लोकांना प्रेरित करणारे काही शतायुषी लोकही जगात आहेत. त्यामध्ये अमेरिकेतील 104 वर्षे वयाच्या डोरोथी हॉफनर यांचा समावेश होतो. त्यांनी या वयात तब्बल 13,500 फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग केले आणि जगण्याची उमेद गमावलेल्या निरुत्साही लोकांना नवी प्रेरणा दिली. त्या जगातील सर्वाधिक वयाच्या स्कायडायव्हर बनल्या आहेत.
डोरोथी यांनी नुकतेच अमेरिकेत शिकागो शहरापासून नैऋत्येला 85 मैलांवर असलेल्या ठिकाणी'स्कायडाईव्ह शिकागो' या संस्थेच्या सहाय्याने स्काय सर्फिंग केले. सध्या 'स्कायडाईव्ह शिकागो'चे अधिकारी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्द्वारा डोरोथी यांच्या डायव्हिंगला एका विक्रमाच्या स्वरूपात प्रमाणित करण्यासाठी काम करीत आहेत.
सध्या डोरोथी यांचा स्कायडायव्हिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एक्स (ट्विटर) वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 104 वर्षे वयाच्या डोरोथी हॉफनर यांनी 4 हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवरून पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतली. इतक्या वयात स्कायडायव्हिंग करणार्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरू शकतात. यापूर्वीचा असा विक्रम स्वीडनच्या लिनिया इंगे गार्ड यांच्यावर नावावर आहे. त्यांनी मे 2022 मध्ये वयाच्या 103 व्या वर्षी स्कायडायव्हिंग केले होते. डोरोथी यांनी यापूर्वी वयाच्या शंभराव्या वर्षी स्कायडायव्हिंग केले होते. आता त्यांना हॉट एअर बलूनची सवारी करण्याचीही इच्छा आहे.