मेव्हणीच्या लिव्ह इन पार्टनरचा बहिणीच्या नवऱ्याने काढला काटा

मेव्हणीच्या लिव्ह इन पार्टनरचा बहिणीच्या नवऱ्याने काढला काटा
Published on
Updated on

पुणेः पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथील एका व्यवसायिकाच्या खूनाचा छडा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लावला असून, चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. गोवा येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना खेड शिवापूर परिसरातून त्यांना पकडण्यात आले आहे. मेव्हणीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारा व्यवसायिक त्रास देत होता. त्या कारणातून मेव्हण्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून त्याचा काटा काढला. झो मॅन्युअल परेरा (रा. मुंबई) असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.

याप्रकरणी, अशोक महादेव थोरात (वय.35,रा.एनडीए रोड, वारजे, मुळ.आष्टी बीड), गणेश साहेबराव रहाटे (वय.35,रा.अप्पर मुळ.अकोले,जि.अहमदनगर), धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके (वय.40,रा.हरकारनगर भवानी पेठ), योगेश दत्तु माने (वय.40,रा.वारजे माळवाडी) या चौघांना अटक करण्यात आले आहे. माने हा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आहे. तर धीरज साळुंके हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, अपहरण, खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पौड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

झो परेरा मुळचा कलिना मुंबई येथील आहे. त्याचा माशांचा व्यवसाय आहे. तो आरोपी योगेश माने याच्या मेव्हणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. झो हा माने याच्या मेव्हणीला त्रास देत होता. तिने याबाबत माने आणि त्याच्या पत्नीला सांगितले होते. 20 डिसेंबर रोजी योगेश माने हा आपल्या तिघा साथीदारांना घेऊन मुंबई येथे गेला. तेथे झो सोबत त्यांचा वाद झाला. वादात माने आणि त्याच्या साथीदारांनी बोथट हत्याराने झो याच्या डोक्यात मारहाण केली. तसेच त्याचा गळा आवळला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मुंबईत मृतदेह टाकला तर पोलिस आपल्याला पकडतील अशी भिती आरोपींनी होती. त्यामुळे त्यांनी झो याच्या मृतदेहाची विल्हेवाट मुळशी परिसरात लावण्याची योजना तयार केली. ठरल्यानुसार चारचाकी गाडीतून मृतदेह आणून मुळशी परिसरातील रोडलगत असलेल्या झाडीत टाकून दिला.

असा लागला खूनाचा छडा… 

झो याचा काटा काढल्यानंतर चौघे आरोपी गोवा येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. खेड शिवापुर येथे थांबून ते पैशांची जुळवाजुळव करत होते. दरम्यान सराईत गुन्हेगार चेक करत असताना, याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत झो हा माने याच्या मेव्हणीला त्रास देत असल्याच्या कारणातून त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पौड पोलिस ठाण्याशी संपर्क करून माहिती दिली असता, 21 डिसेंबर रोजी सकाळी मिळून आलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झो याचा असल्याचे निष्पन्न झाले. कोलाड रोडलगत गोणवडी गावच्या हद्दीत झो याचा मृतदेह मिळून आला होता. ही कामगिरी, पोलिस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी सुरेंद्र जगदाळे,ईश्वर आंधळे,सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे,विजय गुरव, प्रदिप शितोळे,शंकर संपते, आशा कोळेकर, सौदोबा भोजराव, पवन भोसले, अमोल पिलाने, किशोर बर्गे यांच्या पथकाने केली.

मुंबईतील एका व्यवसायिकाचा खून करून त्याचा मृतदेह आरोपींनी मुळशी परिसरात टाकून दिला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संशयित आरोपींना खेड शिवापूर परिसरातून पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हा खूनाचा प्रकार समोर आला आहे.

               प्रताप मानकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खंडणी विरोधी पथक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news