

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या बॅडमिंटन महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सिंधूचा चीनच्या ही बिंग जिआओने सरळ डावामध्ये पराभव केला. त्यामुळे सलग तीन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकण्याचे सिंधूचे स्वप्नही भंगले. ५६ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूला सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या चिनी खेळाडुकडून 21-19, 21-14 असा पराभव स्वीकारावा लागला.
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये रौप्य पदक आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक विजेत्या सिंधूचा ही बिंग जिआओ विरुद्ध 21 सामन्यांमध्ये हा 12 वा पराभव. यासोबतच ही बिंग जिआओने टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूविरुद्धच्या पराभवाचा बदलाही घेतला. सिंधूने 1 ऑगस्ट रोजीच टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदासाठीच्या सामन्यात बिंग जिओचा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते.
या सामन्यात सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही. ही बिंग जिआओने काही अचूक स्मॅश मारले तेव्हा सिंधूकडून काही चुका झाल्या. यामुळे चिनी खेळाडूला 5-1 अशी आघाडी घेता आली. सिंधूला कोर्टवर हालचाल करण्यात अडचण येत होती. तसेच काही फटके मारून तिने चीनच्या खेळाडूला ७-२ अशी आघाडी घेण्याची संधी दिली. यानंतर सिंधूनेही काही चांगले गुण मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण ब्रेकपर्यंत ही बिंग जिआओ 11-8 ने पुढे राहिली. सिंधूने चीनच्या खेळाडूवर दबाव आणला. अगदी जवळचे तीन गुण तिच्या बाजूने गेल्यामुळे सिंधूला नशिबाचा फायदा झाला.
चीनच्या खेळाडूने दबावाखाली काही चुकाही केल्या पण त्यानंतर सलग तीन गुण घेत 17-14 अशी आघाडी घेतली. सिंधूच्या अंगावर स्मॅश मारत ही बिंग जिआओने 19-17 अशी आघाडी घेतली. सिंधूने सलग दोन गुण घेत गुणसंख्या 19-19 अशी बरोबरीत आणली. चीनच्या खेळाडूने लाईनवर शॉट मारून गेम पॉइंट मिळवला आणि नंतर दीर्घ रॅलीनंतर 30 मिनिटांत क्रॉस कोर्ट स्मॅशसह पहिला गेम 21-19 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही ही बिंग जिआओने सिंधूला तिच्या स्मॅशसह अडचणीत आणले आणि सलग सहा गुणांसह 8-2 अशी आघाडी घेतली.
सिंधूने सलग तीन गुणांसह 5-8 ने आघाडी घेतली. परंतु, ही बिंग जिआओने सलग पाच गुणांसह 13-5 अशी भक्कम आघाडी घेतली. सिंधूने कोर्टबाहेर काही शॉट मारले ज्यामुळे चीनच्या खेळाडूला 16-8 अशी आघाडी मिळाली. सिंधूने बाहेरून फटका मारल्यानंतर ही बिंग जिओने 19-11 अशी आघाडी घेतली. सिंधूने सलग दोन गुण मिळवले पण त्यानंतर बिंग जिओने कोर्टच्या शेवटच्या भागात शॉट खेळून सात मॅच पॉइंट मिळवले. सिंधूने एक मॅच पॉइंट वाचवला पण नंतर शॉट वाईड मारला आणि खेळ आणि सामना ही बिंग जिआओच्या झोळीत टाकला.