पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) दोन कांस्य पदक पटकावत इतिहास घडविणारी भारताची युवा नेमबाज मनू भाकर ( Manu Bhaker) आता पदकांची हॅटट्रिक करत नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने सुवर्णपदक जिंकावे, अशी प्रत्येक भारतीयाची मन:पूर्वक इच्छा असेल. आज (दि. १ ऑगस्ट) या स्पर्धेला ती सुरुवात करणार आहे. तर ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास ३ ऑगस्ट रोजी ती आणखी एका पदकाचा लक्ष्यभेद करण्यासाठी सज्ज असणार आहे.
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आज दुपारी साडेबारा वाजता महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकार स्पर्धेतला प्रारंभ होईल. आज या स्पर्धेतचे प्रशिक्षण असेल. यानंतर शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजत या स्पर्धेतील पात्रता फेरी होईल. २ ऑगस्ट रोजीच या प्रकरारतील जलद पात्रता होईल. यातून अंतिम फेरीसाठी विनड होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता या प्रकारतील अंतिम फेरी होणार आहे.
पॅरीस आलिम्पिकमध्ये मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. तिने प्रथम 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक पटकावले. यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबज्योत सिंग याच्यासोबत दुसर्या कांस्य पदकाला गवसणी घातली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.
हरियाणातील २२ वर्षीय मनू भाकर हिला मागील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. ऐन स्पर्धेवेळी तिची पिस्तुल खराब झाली होती. तिचे २० मिनिटे वाया गेली. यामुळे ती अंतिम फेरीपूर्वीच बाहेर पडली होती. या अपयशाने मनू थाेडी खचली हाेती. मात्र तिला तिच्या कुटुंबीयांची भक्कम साथ लाभली. अपयश हीच यशाची पहिली पायरी मानत तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रचंड परिश्रम घेतले. आपल्या दृढनिश्चियाच्या जोरावर तिने जोरदार पुनरागमन करत अंतिम फेरीत धडक मारली होती. कोट्यवधी भारतीयांच्या आशा मनू भाकरच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. मनूही टोकियो ऑलिम्पिकमधील अपयश धूवून काढत पॅरीस ऑलिम्पिक सलग दोन कांस्य पदक पटकावत नवा इतिहास घडवला आहे. नेमबाजीत पदक पटकविणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होतीच. आता एकच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके पटकविणारी ती भारतातील पहिली खेळाडू ठरली आहे.
मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिला भारतीय नेमबाज ठरण्याचा विक्रमही तिच्या नावावर नोंदला गेला आहे.
ऑलिम्पिकमध्ये सांघिक पदक जिंकणारी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग ही पहिली भारतीय नेमबाजी जोडी ठरली आहे.
वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू भाकर पहिली नेमबाज ठरली आहे.