

अमृतसर; वृत्तसंस्था : शीख धर्माच्या मर्यादा आणि आनंद कारजसाठी (विवाह) पाच साहिबनी नांदेडच्या श्री हजूर साहिबच्या वतीने नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. यानुसार लग्नावेळी वधू फेरे (लावों) घेत असताना लहंगा घालू शकत नाही. लग्नावेळी वधूला कमीज, सलवार आणि डोक्यावर चुन्नी घालावी लागणार आहे. या नियमाचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
गुरूद्वारात येताना वधू महागडा फॅशनेबल लहंगा आणि घागरा घालून येतात. या पोशाखात वधूला चालणे, उठणे-बसणे आणि गुरू महाराजासमोर नतमस्तक होणे अवघड होते. तसेच विवाहच्या निमंत्रण पत्रिकेत वर मुलाच्या नावापढे 'सिंग' आणि वधूच्या नावापुढे 'कौर' लिहिले जात नाही आणि हे चुकीचे आहे. पत्रिकेच्या बाहेर आणि आत सिंग आणि कौर अनिवार्य केल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी लग्नात श्रीगुरुग्रंथ साहिब घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. काही लोक श्रीगुरुग्रंथ साहिब सागर किनार्यावर घेऊन जातात आणि लग्नाचे फेरे घेतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.