सिकंदर शेख ठरला ‘जनसुराज्य शक्ती श्री’

सिकंदर शेख ठरला ‘जनसुराज्य शक्ती श्री’
Published on
Updated on

वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : कुस्तीशौकिनांनी खचाखच भरलेल्या कुस्ती पंढरी वारणा (ता. पन्हाळा) येथील मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी महान भारत केसरी कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा मल्ल सिकंदर शेखने अवघ्या आठव्या मिनिटाला दिल्लीच्या वीरेंद्र आखाड्याच्या हिंदकेसरी मोनू दहिया याला निकाल डावावर अस्मान दाखवून मैदानातील मानाचा 'जनसुराज्य शक्ती श्री' किताब पटकाविला. त्यावेळी कुस्ती शौकिनांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सिकंदरचा विजय साजरा करत जल्लोष केला.

द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत इराणच्या अहमद मिर्झाने जम्मू-काश्मीरच्या अमन बनियाला चितपट केले. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत देवठाण्याच्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने पंजाबच्या भारत केसरी लाली मांडला अस्मान दाखविले.

वारणा परिसरचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणार्थ बुधवार, दि. 13 रोजी वारणानगर येथील वारणा विद्यालयाच्या प्रांगणात विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे, कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान झाले. भारतासह इराण देशातील मल्लांच्या या लढती तब्बल आठ तास चालल्या.

आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महासंग्रामात प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्य शक्ती श्री किताबासाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध मोनू दहिया (दिल्ली) यांच्यात रात्री दहा वाजता लढत सुरू झाली. त्यापूर्वी सिकंदर मैदानात येताच शौकिनांनी प्रोत्साहन देत त्याचे स्वागत केले. लढत सुरू होताच सिकंदरने दुसर्‍या मिनिटाला दस्ती ओढून मोनू दहिया याचा कब्जा घेतला. त्यातून मोनू सुटका करत असताना सिकंदरने डाव्या पायाचा पट काढून कब्जा कायम ठेवला. त्यानंतर हाताचा घुटना मानेवर ठेवून मोनूस जेरीस आणण्याचा प्रयत्न केला .

मात्र त्याला दाद न देता मोनूने सिकंदरला डाव करण्यापासून रोखून धरले. सहाव्या मिनिटाला सिकंदरने एकचाक डावाची पकड केली. मात्र, त्यातूनही मोनू सहिसलामत सुटला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांंचा कडकडाट केला. पुन्हा सिकंदरने कब्जा घेतल्यावर त्यातून सुटून मोनू समोर आला. ही संधी साधत सिकंदरने आठव्या मिनिटाला मोनूला निकाल डावावर चितपट केले आणि आपणच सिकंदर असल्याचे सिद्ध केले.

वारणा साखर शक्तीसाठी रंगली दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती

या किताबासाठी जम्मू-काश्मीरचा अहमद बनिया विरुद्ध इराणचा अहमद मिर्झा यांच्यात झाली. अहमद मिर्झाने प्रारंभापासून आक्रमक कुस्ती करत चौथ्या मिनिटाला अहमद बनियाला मोळी डावावर चितपट करून वारणा साखर शक्ती केसरी किताब पटकाविला.

वारणा दूध संघ शक्ती किताबासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (देवठाणे, कोल्हापूर) विरुद्ध लाली मांड (पंजाब) यांच्यात झाली. पृथ्वीराजने प्रथमपासून लाली मांडवर कब्जा मिळविला. पृथ्वीराजने दोन वेळा बॅक थ्राे मारायचा प्रयत्न केला, पण तो फसला. पुन्हा लाली मांडने उठून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत असताना पृथ्वीराजने उलटी आकडी लावत लाली मांडला चितपट केले.

वारणा बँक शक्ती किताबासाठी माऊली कोकाटे (पुणे) विरुद्ध भीम धूमछडी-पंजाब यांच्यात दहा मिनिटे कुस्ती झाली. प्रारंभी माऊलीने भीम धूमछडीवर कब्जा मिळविला आणि नंतर घुटना डावावर विजय मिळविला.

वारणा दूध साखर वाहतूक शक्ती

कोल्हापूरचा प्रकाश बनकरने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कब्जा घेतला. हा कब्जा दिल्लीच्या अभिनायकवर कायम ठेवत एकलंगी डावाचा प्रयत्न केला, पण अयशस्वी झाला. लगेच नाकपट्टी डावावर प्रकाश बनकर विजयी झाला. पुण्याच्या दादा शेळके व हिमालचा पालिंदर – मथुरा यांच्यातीत लढत प्रेक्षणीय झाली. घिस्सा डावावर दादा शेळके विजयी झाला. वारणा ऊस वाहतूक शक्ती किताब पटकावला .

कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हरियाणाचा जितेंद्र त्रिपुडे यांच्यातील कुस्ती अत्यंत अटीतटीची झाली. सहाव्या मिनिटाला कार्तिकचा जितेंद्रने कब्जा घेतला. त्यातून सुटून मच्छीघोता डावावर कार्तिकने चितपट करण्याचा प्रयत्न केला, त्यातून जितेंद्र बचावला पुन्हा कार्तिकने खालून एकेरी पट काढला कब्जा घेतला. जितेंद्रने यातून सुटका करून घेतली. मात्र कार्तिकने खालून डंकी मारत जितेंद्रला अस्मान दाखविले व वारणा बिलट्यूब शक्ती केसरी किताब पटकाविला.

सांगलीच्या सुबोध पाटीलने दिल्लीच्या संदीप कुमारला घुटना डावावर चितपट करून वारणा शिक्षण शक्ती श्री किताब पटकाविला.
टेभूर्णीच्या सतपाल सोनटक्केने चौथ्या मिनिटाला दुहेरी पटाने ताबा घेतला व सहाव्या मिनिटाला एकचाक डावावर रझा इराणीला चितपट करून वारणा बझार केसरी किताब पटकाविला.

गंगावेसच्या कालीचरण सोलणकरने चौथ्या मिनिटाला दिल्लीच्या देव नरेलावर ताबा मिळवून इराणी एकलंगी डावावर विजय मिळवत ई. डी. अँड एफ. मान शक्ती किताब पटकाविला .

वारणा नवशक्ती किताबासाठी झालेल्या कुस्तीत वारणेच्या नामदेव केसरेने हरियाणाच्या रवी कुमारला निकाली डावावर चितपट केले.
दुपारी दोन वाजता कुस्ती मैदानाचे पूजन वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या हस्ते झाले. मैदानात 11 किताबाच्या कुस्त्या, 33 पुरस्कृत कुस्त्यांसह 250 वर लहान – मोठ्या लढती झाल्या.

हिंदकेसरी दीनानाथसिंह, संतोष वेताळ, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील (रेठरेकर), डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, सेनादल केसरी गुंडा पाटील यांच्यासह देशातील नामवंत मल्ल व कुस्तीशौकिनांची उपस्थिती होती.

यावेळी कुस्तीभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, दलितमित्र अशोकराव माने, पन्हाळा-शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे उपस्थित होते.

वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील यांनी मैदानाचे संयोजन केले तर शंकर पुजारी व ईश्वरा पाटील यांनी निवेदन केले.

जागतिक विक्रमवीर पै. संजयसिंह याचे आव्हान नेणापूरच्या संतोषने स्वीकारले

दहा हजार सपाटे मारणारे हरियाणाचे जागतिक विक्रमवीर पै. संजयसिंह यांनी सपाटे मारण्याचे प्रात्यक्षिक केले. त्याचे आव्हान नाथा पवार बेणापूर तालमीचे मल्ल व दोन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन ठरलेले संतोष सरगर यांनी स्वीकारले आणि सपाटे सुरू केले. पै. संजयसिह याने 320 सपाटे मारून मारणे कायम ठेवले. संतोषने 310 सपाटे मारल्यानंतर आमदार विनय कोरे यांनी कौतुक करून थाबविले. मात्र, मैदानात आव्हान स्वीकारणारा महाराष्ट्रात आहे हे संतोषने दाखवून दिले. त्याचा विशेष सत्कार आमदार विनय कोरे यांनी करून कौतुक केले.

चार हजार कुस्ती मैदानांचे समालोचन करणारे पै. शंकर पुजारी निवृत्त

77 वर्षे वय असणारे चार हजार कुस्ती मैदानांचे धावते समालोचन करणारे शंकर पुजारी यांनी येथे आपली निवृत्ती जाहीर केली. त्यांचे मूळ गाव कोथळी असून ते सांगली येथे सरावही करायचे. त्यांच्या उमेदीच्या काळातील हिंदकेसरी मारुती माने, हरिश्चंद्र बिराजदार यांच्या बरोबरच्या कुस्त्या गाजल्या. त्यानंतर निवेदक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. प्रत्येक पैलवानाच्या तीन पिढ्यांची माहिती असणारे ते एकमेव निवेदक आहेत. यानिमित्त त्यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news