

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, आज दुपारी सिद्धरामय्या पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. ( karnataka cm announcement)
काँग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करणार आहेत. कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षात चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते सिद्धरामय्या आज नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, डी. के शिवकुमार यांना आज दिल्ली भेटीबद्दल विचारले असता त्यांनी, "दिल्लीला जायचे की नाही हे अजून ठरवले नाही' असे म्हटले आहे. डी. के. शिवकुमार यांचा आज ६२ वा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. karnataka cm announcement)
रविवारी रात्री काँग्रेसच्या १३५ आमदारांची बैठक येथील खासगी हॉटेलमध्ये झाली. बैठकीपूर्वी हॉटेलच्या बाहेर शिवकुमार आणि सिद्धरामय्या दोघांचेही सुमारे पाच हजार समर्थक जमले होते. आपल्याच नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा ते देत होते. दोन्ही नेत्यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन करून विधिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.
बंगळूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेसचे निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, पक्षाचे सरचिटणीस जितेंदर सिंग, माजी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्या नेतृत्वाखाली रात्री राज्यातील सर्व आमदारांची बैठक झाली. बैठकीत सर्व आमदारांशी चर्चा करुन त्यांची मते घेऊन विधिमंडळाचा गटनेता निवडून मुख्यमंत्री निवडला जाणार होता. पण या बैठकीत सर्व आमदारांनी सर्वानुमते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांडने घ्यावा, असा ठराव करत सर्वाधिकार पक्षाध्यक्षांकडे सोपवण्याचा एका ओळीचा ठराव केला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधींचा मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांना पाठिंबा असल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या हे राज्यात पक्षाचे वरिष्ठ नेते असून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीला होईल, असे त्यांना वाटते. सध्या सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करुन, लोकसभा निवडणुकीनंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा विचार राहुल यांचा आहे. (karnataka cm announcement)