

पुढारी ऑनलाईन : माझी मुलगी श्रद्धा हिची हत्या झाली. याचे मला आणि माझ्या कुटुंबाला अतिशय दुःख आहे. माझा न्यायव्यस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आफताब आणि त्याच्या कुटुंबियांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. श्रद्धाला न्याय मिळेल यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आश्वासन दिल्याचेही श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सांगितले. ते पहिल्यांदाच मुंबई येथे माध्यमांसमोर पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे ते म्हणाले, माझ्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. वसई पोलिसांमुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, त्यांनी मला मदत केली असती तर माझी मुलगी जिवंत राहिली असती; असा आरोप देखील श्रद्धाचे वडिल विकास वालकर यांनी यावेळी केला. आम्हाला न्याय मिळेल, असे आश्वासन दिल्ली पोलिस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिले असल्याचे ते म्हणाले.
मी माझ्या मुलीशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण गेल्या दोन वर्षांत तिने मला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. तिझ्यासोबत काय होत हे तिने मला कधीच सांगितले नाही. त्यामुळे वयानुसार मिळणाऱ्या स्वातंत्र्यावरील कायद्यांमधील नियम आणखी कडक करण्यात येणे अपेक्षित आहेत. हिंदू धर्मजागृतीवर भर दिला पाहिजे. दिल्ली आणि वसई पोलिसांचा संयुक्त तपास हा योग्य दिशेने सुरू असून त्यांच्याकडून माझी मुलगी आणि आमच्या कुटूंबाला न्याय मिळेल याचा मला विश्वास असल्याचेही ते म्हणाले.