‘माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत अजून पैदा व्हायचाय’ असे म्हणत दोनदा गोळीबार

‘माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत अजून पैदा व्हायचाय’ असे म्हणत दोनदा गोळीबार
Published on
Updated on

बारामती; पुढारी वृत्तसेवा: येथील गणेश जाधव याच्यावर गोळीबार करत त्याच्या मित्रांवर हल्ला केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी शुभम राजपुरे व तुषार भोसले यांच्यासह अन्य आठ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकी घासून नेल्याच्या वादातून हा प्रकार घडला. शुभम राजपुरे याने 'तु कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत पैदा व्हायचा आहे' असे म्हणत पिस्तुलातून गणेश जाधव याच्या दिशेने दोनदा फायरिंग केले. दुसऱ्यावेळेस केलेल्या फायरिंगमध्ये एक गोळी गणेशच्या पोटात लागली.

३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेने बारामतीत मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात ऋत्विक जीवन मुळीक (वय २१, रा. कुंभरकरवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पेन्सिल चौक ते जळोची रस्त्यावरील चाय चस्का दुकानात फिर्यादी हा त्याचे मित्र तेजस पवार, स्वप्निल भोसले, रवी माने यांच्यासह गेला होता. चहा पिवून तो रस्ता ओलांडत असताना ट्रीपल सीट आलेली दुचाकी फिर्यादीला घासून गेली.

त्यामुळे फिर्यादीने अरे पुढे पाहून नीट गाडी चालवं, माणसांना मारतो का, अशी विचारणा केली. त्यावर दुचाकी वळवत आणत त्यावरील एकाने फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या मित्रांनी त्यांची सुटका केली, परंतु यावेळी मित्रांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तेजस पवार याच्याकडून दुचाकीवरून कट मारणारा मुलगा हा तुषार भोसले असून तो शुभम राजपुरे याचा साथीदार असल्याचे तसेच त्यांची बारामती शहर, एमआयडीसी परिसरात दादागिरी असल्याचे समजले. या घटनेनंतर फिर्य़ादी मित्रांसह तेथून निघून गेले.

काही वेळाने ही बाब गणेश जाधव याला सांगण्यासाठी ते भिगवण रस्त्यावर सहयोग सोसायटीजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर आले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ते गणेश जाधव याला चाय चस्का दुकानासमोर घडलेली घटना सांगत असताना तेथे चार ते पाच दुचाकी आल्या. एका दुचाकीवर शुभम राजपुरे बसला होता. त्यांच्या हातात कोयते होते. शुभम याने तुषार भोसले याला, कोण आहे रे तो, मस्ती आलीय काय, मी बारामतीचा बाप आहे, साल्यांना ठोका असे म्हणाला.

त्यावेळी तुषार भोसले हा कोयता घेवून फिर्यादीच्या अंगावर आला. गणेश जाधव याने मध्यस्थी करत, माझा लहान भाऊ आहे, जाऊ द्या, असे सांगितले असता राजपुरेसोबत आलेल्या अन्य तरुणांनी फिर्यादी व गणेश जाधव यांच्या डोक्यात मारण्यासाठी कोयता उगारला. फिर्यादीने तो हाताने अडवला. फिर्यादी शेजारी उभ्या असलेल्या अतुल भोलानकर याने गणेश जाधव याच्यावर उगारलेला कोयता हाताने अडवून ठेवला.

त्यामुळे चिडलेल्या शुभम राजपुरे याने कमरेला लावलेला पिस्तुल लोड करून गणेश जाधव यास, तु कोण दादा लागून गेलास का, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा अजून पैदा व्हायचा आहे असे म्हणत गणेश जाधव याच्या दिशेने फायरिंग केले. परंतु जाधव यांना गोळी लागली नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा पिस्तुल लोड करत फायरिंग केली.

ती गोळी गणेश जाधव याच्या पोटाजवळ लागली. या घटनेने गणेश जाधव हा खाली कोसळला.त्यानंतर आरडाओरडा करत दहशत निर्माण करत सर्वजण दुचाकीवरून निघून गेले. गोळीबाराच्या आवाजाने पेट्रोलपंपावरील लोकही पळून गेले होते. फिर्य़ादी व अन्य मित्रांनी जाधव याला रक्तबंबाळ अवस्थेत बारामती हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
शुभम राजपुरे, तुषार भोसले व त्यांच्या अन्य आठ साथीदारांनी मुळीक व जाधव यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा थरार रिलायन्स पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे. बारामतीतील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हल्लेखोरांनी माजवलेली दहशत अंगावर काटा आणणारी आहे.

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
या घटनेतील मुख्य आरोपी शुभम राजपुरे, तुषार भोसले हे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. दरम्यान अन्य अनोळखींमधील काहींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चौकशी सुरु असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल असे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे व सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news