

पुणे; पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसच्या पदाधिकार्याचा खून करणार्याचा कट दोन महिन्यापूर्वीच शिजल्याचे व पिस्तुल मिळाल्यानंतर गोळ्या झाडण्याची प्रॅक्टीस एका जंगलात केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील मास्टर माईंडसह तिघांना आठ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत.
मुख्य संशयीत आरोपी मेहबूब सैफान बलुरगी (33, रा. जनता वसाहत, पर्वती, मार्केटयार्ड), सुफियान फैयाज चौरी (19, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) आणि निलेश सुनिल कुंभार (30, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर उर्फ लालबादशाह हुसेन मनुर (32, रा. अरमान हाऊस, काळुबाईनगर, फालेनगर, आंबेगाव बुद्रुक) यांचा खून करण्यात आला होता.
सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाारस समीर हे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चंद्रभागा हॉटेल समोर चहा पिण्यासाठी गेले असता. दुचाकीवर आलेल्या संशयीत आरोपींनी त्यांच्यावर बेदुट गोळीबार केला. या गोळीबारात सहा गोळ्या लागून समीर हे जागीच ठार झाले.
याप्रकरणाचा तपास करताना, मुख्य आरोपी मेहबुब हा जनता वसाहत परिसरात लपून बसल्याची माहिती तपास पथकातील अंमलदार राहूल तांबे आणि धनाजी धोत्रे यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी इतर साथीदारांची माहिती मिळताच दोन साथीदार कोरेगाव पार्क परिसरात लपल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार चौरी आणि कुंभारसह आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. चौघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी हा खून समीर यांच्या बरोबर असलेल्या पैशाच्या व्यवहारातूनच केल्याचे सांगितले.
दरम्यान, चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिश्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी नितीन शिंदे, अंकुश कर्चे, अमंलदार रविंद्र भोसले, हर्षल शिंदे, गणेश सुतार, आशिष गायकवाड, गणेश शेंडे, राहूल तांबे, सचिन गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गोळ्या झाडण्याची प्रॅक्टीस पुण्यातील जंगलात
संशयीत आरोपी मेहबूब याला समीर हे पैसे देणे लागत होता. परंतु, समीर हे पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ करत होते. यापूर्वी समीर यांनी देखील मेहबूबला मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून मेहबूब याने पिस्तुल खरेदी केले होते. त्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्याची प्रॅक्टीस त्यांनी पुण्यातील एका जंगलात केली असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
हेही वाचा