

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा: सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यातर्फे सध्या दीपावलीनिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू आहे. मृत सभासदांच्या वारसांनाही साखर दिली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.
नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याचे सुमारे अडीच ते तीन हजार सभासद मृत आहेत. त्यापैकी बहुतेक मृत सभासदांच्या वारसांनी शेअर्स वर्ग करून घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दिलेले नाही. त्यामुळे ते शेअर्स वारसांच्या नावावर वर्ग होऊ शकलेले नाहीत. तथापि जे सभासद मृत झाले, त्यांच्या वारसांनी सभासद साखर विक्री कार्ड व स्वतःचे ओळखपत्र घेऊन आपल्या गटाच्या संबंधित साखर वाटप केंद्रावर जावे. त्यांना साखर दिली जाईल. तसेच वारसांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून आपले शेअर्स वर्ग करून घ्यावेत. अन्यथा त्यांना सभासद म्हणून कारखान्याकडून इतर कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाहीत, असे नागवडे यांनी सांगितले.
कारखान्यास सन 2021-22 या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणार्या सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकर्यांना आतापर्यंत 2434 रुपये 85 पैसे याप्रमाणे एफआरपी पेमेंट पूर्ण अदा केलेले आहे. परंतु आपण जाहीर केल्याप्रमाणे 2 हजार 601 दरापैकी उर्वरित रक्कम 166.15 ही येत्या 17 तारखेला सभासद, शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच येत्या 15-16 ऑक्टोबरपासून कारखान्याचा गाळप हंगाम नियमितपणे सुरू होणार असल्याचेही नागवडे यांनी सांगितले.