Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीला सुरूवात; राहुल शेवाळेंची उलटतपासणी

Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीला सुरूवात; राहुल शेवाळेंची उलटतपासणी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणीत खळबळजनक खुलासे होत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजही (दि.९) विधीमंडळात सुनावणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे वकिल अनिल साखरे यांच्याकडून ठाकरे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलटतपासणी सुरू आहे. शुक्रवारच्या सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरत आणि गुवाहाटी दौऱ्यावरून ठाकरे गटाच्या वकिलांनी उलटसुलट प्रश्नांचा मारा केला. त्यावर, लांडे आणि कदम यांनी वेगवेगळी उत्तरे देत चकवा देण्याचा प्रयत्न केला. (Shiv Sena MLA Disqualification Case)

खासदार राहुल शेवाळे यांना विचारलेले प्रश्न आणि उत्तरे (Shiv Sena MLA Disqualification Case) :

अनिल साखरे – २३ जानेवारी २०१८ ला काही सभा झाली, संघटनात्मक निवडणुका झाल्या का?

राहुल शेवाळे – मी सन २००० पासून शिवसैनिक आहे. मी पहिल्यांदाच हे कागद पाहतो आहे. या कागदावरील माहिती खोटी आहे. त्या दिवशी बैठक झाली नाही त्यामुळे कोणत्या निवडणुका किंवा मतदानही झाले नाही.

साखरे – २५ जून २०२२ च्या बैठकीबद्दल काय सांगाल?

शेवाळे – या दिवशी शिवसेना भवनात गेलो होतो. मी दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा खासदार आहे आणि सेनाभवन माझ्या मतदारसंघात येतो. स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने मी अनेकदा सेनाभवनात जात असतो. त्यावेळी जी राजकीय स्थिती उद्भवली होती, त्यामुळे २५ जुनपुर्वीच सर्व शिवसेना खासदारांची शिवसेना भवनात बैठक झाली. त्यात आपण, पक्षाने पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी व्हायला हवे, भाजपसोबत युती करायला हवी, असे सांगितले. २५ तारखेला उद्धवसाहेब येणार होते, म्हणून तिथे गेलो. आम्ही सर्व खासदारांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली की, आपण २०१९ ला एनडीए म्हणून निवडणुका लढविल्या आणि जिंकलो. लोकांनी महायुतीसाठी मतदान केले होते. आता तुम्ही (उद्धव ठाकरे यांनी) महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने लोक, मतदार नाराज आहेत. त्यामुळे आपण भाजपसोबत एनडीएमध्ये जायला हवे. २०२४ ची निवडणूक जिंकायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवायला हव्यात, हे ही सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० हटवून, राम मंदिर उभारणीला सुरुवात करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पुर्तता केली आहे. त्यामुळे आपण भाजपसोबत गेले पाहिजे. बाळासाहेबांनी वारंवार सांगितले होते की, ज्या दिवशी काँग्रेससोबत जायची वेळ येईल, त्या दिवशी मी शिवसेना नावाचे दुकान बंद करेन. तसेच, खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्रास देतात आणि काम करण्यात अडचणी निर्माण करतात. उद्धव ठाकरे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याबाबत विचार करून कळविण्याचे आश्वासन दिले. या चर्चेनंतर आम्ही सगळे आपआपल्या मतदारसंघात परतलो.

साखरे – या बैठकीत कोणते ठराव झाले का?

शेवाळे – २५ जून २०२२ च्या या बैठकीत कोणता ठराव झाला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची घटना बनवली. १९९९ साली निवडणूक आयोगाच्या विनंतीनंतर त्यात बदल करण्यात आले. त्यानंतर त्या घटनेत कोणते बदल झालेले नाहीत.

यानंतर साखरे यांनी एक सूचक प्रश्न विचारला. यावरून वादंग निर्माण झाला.

साखरे – २३ जानेवारी २०१८ च्या बैठकीत काय झाले ते सांगा?

देवदत्त कामत – साखरे हे मराठीत प्रश्न विचारत आहेत, असा आक्षेप घेतला.

अनिल साखरे – मराठीत प्रश्न का नाही विचारायचे. हा महाराष्ट्र आहे आणि मराठी आमची मातृभाषा आहे.

शेवाळे – तिथे अशी कोणती चर्चा झाली नाही.

अनिल साखरे – २०१४ ते २०२२ या कालावधीत तुमच्या कोणत्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली का?

शेवाळे – राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी झाली नाही आणि मला कधी त्याचे अधिकृत निमंत्रण दिले गेले नाही.

साखरे – जून २०१४ ते जून २०२२ या कालावधीत तुमच्या कोणत्या प्रतिनिधींची बैठक झाली का?

शेवाळे – प्रतिनिधी सभेच्या बैठकीचे मला अधिकृत निमंत्रण दिले गेले नाही.

त्यानंतर साखरे यांनी शेवाळेंना संसदीय मंडळाच्या नेत्याची निवड कशी होते आणि २०१९ नंतर याबाबत काय घडले, यबाबत माहिती विचारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news