Uddhav Thackeray Mahasabha : ‘मुन्नाभाई’सारखा राज ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray Mahasabha : ‘मुन्नाभाई’सारखा राज ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याच दिवसानी मैदानात उतरलो आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे माहिती नाही त्यांच्यासाठी बोलाव लागत आहे. भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी होते. आता आम्ही त्या गाढवांना सोडले आहे. शेवटी गाढव ते गाढव, त्यामुळे घोड्याच्या आवेशात जी गाढवं आमच्यासोबत होती, त्या गाढवांनी लात मारण्यापूर्वी आम्ही त्यांना लात मारून बाहेर पडलो, अशी बोचरी टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. आज मुंबईतील बीकेसीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे, त्यात ते बोलत होते. या सभेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मुंबईचा लचका तोडणा-यांचे तुकडे-तुकडे होणार : उद्धव ठाकरे

मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी विरोधकांना दिला.

स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या स्वातंत्र लढ्यात एकदाही पुढे नव्हता. त्यावेळी कुठे होता संघ? असा सवाल करत स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान नसल्याचे सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या लढाईतून पहिले कोण फुटले तर जनसंघ… तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सामनात जे छापून येते ते जनतेच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे असते. भाजप जी भाषा वापरते तसं आम्ही बोलत नाही. गेल्या 25 वर्षात आम्ही युती सोबत सडलो. हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा आता आम्ही पाहत आहे. खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्वात बसते आमच्या नाही. आत्ताची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींची का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

तुम्हाला मुंबई फक्त ओरबाडण्यासाठी पाहिजे. ज्या ज्या वेळा मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना कार्यकर्ते पहिल्यांदा धावून जातात. कोणतीही आपत्ती येऊ द्या. तो इतरांना मदत करत असतो. रक्तदान करण्यासाठीही अंगात मर्दाचं रक्त असावं लागतं. ते शिवसेनेत आहे. महागाईवर कुणी बोलतच नाही. बऱ्यात दिवसांनी मोदींनी कोविडवर सभा घेतली. देशभरातले मुख्यमंत्री तिथे होते. मी आपला आयपीएल बघितल्यासारखा बघत होतो. मला त्या बैठकीत बोलायचं नव्हतं. सगळे बोलल्यानंतर पंतप्रधान समारोप करताना दिशा दाखवतात. मला वाटलं संपेल. मग अचानक त्यांनी कोविडवरचा उपाय सांगितला की पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा.

तेव्हा तुम्ही नव्हतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही जनसंघ म्हणून होतात. तेव्हा शिवसेना नव्हती. पण बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंना मदत करत होते. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. मतभेद मिटवण्याचं आवाहन त्यांनी केलं. पण त्यातून पहिला फुटला जनसंघ. म्हणजे यांचे पूर्वीचे बाप. जागावाटपावरून भांडण करून फुटले.

यांना झेडप्लस सुरक्षा. टिनपाटांना सुरक्षा देत आहेत. तिथे काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही, पण इथे भोकं पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा देत आहेत. कुणाला वाय प्लस, कुणाला झेड प्लस. काय बापाचा माल आहे तुमच्या? लोकांचा पैसा आहे तो. ज्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे, त्यांना देत नाही. ही असली गळकी टिनपाटं काय उपयोगाची तुम्हाला. टिनपाट सभ्य शब्द बोललो, टमरेलच बोलायचं होतं.

संभाजीनगरमध्ये ओवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवून आला. यांची ए टीम, बी टीम, सी टीम काम करतेय. कुणालातरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्यातरी हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा द्यायची आणि मजा घेत बसायचं. म्हणजे काय कारवाई झाली की त्यांच्यावर होणार आणि आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य.

हनुमान चालिसा, भोंगे वाले ही यांची ए, बी, सी टीम आहे. आमचं हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही उघडपणे राष्ट्रवादी आणि शिवेसेनेसोबत गेलो. : तुमच विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही. हिंदुहृदयसम्राटांनी विचार दिला, तुम्हीं विखार पसरवत आहात. असे विखारी, विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही. हे सर्व मनोरुग्ण आहेत.

मुन्नाभाई चित्रपटात कसे त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात तसे एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालून फिरतो. अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्याला शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना खोचक टोमणा लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या सभेतील अपडेट…

शिवसेनेचं हिंदुत्व छत्रपती संभाजीराजेंसारखं, प्राण जाये पण वचन न जाये असं : संजय राऊत

शिवसेना हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही : संजय राऊत

ओवेसीकडून महाराष्ट्राच्या स्वाभीमानाचा अपमान : संजय राऊत

औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले : संजय राऊत

शिवसेना कुणापुढे झुकणार नाही : संजय राऊत

ख-या तोफा आज धडाडतील : संजय राऊत

मुंबईचा बाप फक्त शिवसेनाच आहे : संजय राऊत

शिवसेनेची तोफ नेहमीच धडाडते : संजय राऊत

संजय राऊत यांनी भाषणाला सुरुवात केली

आजच्या सभेत जोरदार बॅटिंग  होणार आहे. पक्षप्रमुख आज अनेकांचा मास्क उतरवणार आहे  : आदित्य ठाकरे

सभेला आलेल्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये माझे आजोबा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आजी दिसत आहे : आदित्य ठाकरे

दोन वर्ष कोविडचा काळ लोटल्यानंतर पहिल्यांदा अशी ही आपली सभा होत आहे : आदित्य ठाकरे

प्रत्येक जिल्ह्यात मी गेलो, तेव्हा जे आशीर्वाद घेऊन आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले : आदित्य ठाकरे

माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. येताना मी गर्दी बघत होतो. इथे पहिली रांग वांद्र्यात असेल, तर मागची रांग कुर्ल्यात पोहोचली आहे

एवढी तुफान गर्दी आहे : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंनी जय महाराष्ट्र म्हणत भाषणाला सुरुवात केली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह सभास्थळी दाखल झाले आहेत

अयोध्या आमच्या श्रद्धेचा विषय आहे, राजकारणाचा नाही : एकनाथ शिंदे

इतरांनी अयोध्या हा विषय राजकीय बनवला आहे : एकनाथ शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news