मुख्यमंत्रिपदाबाबत शहांशी बंद खोलीत चर्चा झालीच नव्हती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली असे जे सांगतात ते पूर्णपणे खोटे आहे. अशी चर्चा झालीच नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केला. सत्तेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडले, बाळासाहेबांचे विचार सोडले, सावरकरांना सोडले आणि देशद्रोही व देशविरोधी लोकांशी हातमिळवणी केली, त्यांना आता निवडणुका आल्यानंतर पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली, अशी टीका शिंदे यांनी गांधी मैदान येथे झालेल्या विराट जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता केली.

महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर हे दिल्लीला गेले. जाताना त्यांनी मराठी बाणा दाखवला. पण पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी आत गेले आणि यांची अवस्था 'वंदीन चरण, घालीन लोटांगण' अशी झाली, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मोदी यांना भेटून आल्यानंतर आपण आघाडी तोडू, भाजपसोबत जाऊ. उर्वरित अडीच वर्षे आपल्याला मिळतील का, अशी विचारणा केली. यावरून तुम्हाला सत्तेची हाव होती. तुम्हाला सत्ता पाहिजे होती. खुर्ची पाहिजे होती, हे स्पष्ट होते. यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांच्याबरोबर बंद दरवाजाआड चर्चा झाली, हे पूर्णपणे खोटे होते, हेही स्पष्ट होते. आपण त्याच्या आणखी खोलात जाऊ इच्छित नाही.

माझे नाव घेतल्याशिवाय, मला शिव्याशाप दिल्याशिवाय त्यांचा एक दिवसही जात नाही. सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, याचा त्यांना पोटशूळ आहे, असे सांगत शिंदे म्हणाले, सर्वसामान्य शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? केवळ सोन्याचाच चमचा घेऊन आलेला होऊ शकतो? नेहमी वारसा वारसा म्हणता, पण अगोदर आरसा बघा.

दीड वर्षापूर्वी क्रांती केली, उठाव केला. त्यावेळी 50 आमदार माझ्या खांद्याला खांदा लावून सोबत राहिले. आम्ही चुकीचे पाऊल उचलले असते तर आज हे व्यासपीठ आणि मैदान भरले असते का? आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नाही. फिल्डवर उतरून फेस टू फेस काम करतो. यामुळे राज्यभर फिरताना लोकांच्या चेहर्‍यावर जो विश्वास पाहायला मिळतो ती आपली कमाई आहे.

20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण असे म्हणत, लोकांत जा, त्यांच्याशी संवाद साधा, मंत्रालयात नुसते बसू नका, असे बाळासाहेब म्हणत, त्या बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी प्रतारणा केली, त्यांना कायमचे घरी बसविण्याची ही वेळ आहे. हा उत्साह, ही गर्दी महायुतीच्या विजयाची नांदी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसैनिकांना भावनिक करून लढायला पाठवता आणि तो अडचणीत आला तर तुझे तू बघ म्हणता. असा कुठे पक्ष चालतो का? पक्षप्रमुख म्हणून त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे असते, असे सांगत एकनाथ शिंदे यांना लोकांनी मान्य केले. यामुळे हजारो लोक सोबत आहेत. सरकार स्थापन झाले तेव्हापासून जे शिल्लक लोक आहेत, आमदार-खासदार आहेत, त्यांना दररोज हे सरकार आज पडणार, उद्या पडणार असे सांगायचे. पण ज्योतिषीही थकले, सरकार पडले नाही. उलट ते भक्कम आहे आणि केवळ तुमच्या आशीर्वादाने आणखी मजबूत झाले आहे. तुम्ही मात्र इंडिया आघाडी केली. त्यातील एकेक घटक बाहेर पडतोय. तुम्ही कोणाच्या जीवावर पंतप्रधान मोदींना आव्हान देताय. अजून तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरत नाही. चांगल्याला चांगले म्हणा, असे बाळासाहेबांनीच शिकवले होते. ज्या मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले, त्यांच्याविषयीही तुम्ही एकही शब्द काढला नाही. जे राम मंदिरवरून चेष्टा करायचे, आता मंदिरही झाले, त्याचे उद्घाटनही झाले, असे सांगत 'जो राम का नही, वो किस काम का नही', असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे डबल इंजिन सरकार आहे. यामुळे कोल्हापूरच्या विकासाचा वेग वाढवला जाईल. त्याकरिता हवा तितका निधी दिला जाईल. कोल्हापुरातील रस्ते चकाचक होतील. मी शब्द पाळणारा आहे. टोल घालवणार असा शब्द दिला होता, मी टोल घालवला असे सांगत, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, कोल्हापूरचा महापूर थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने निधी, नागपूर-गोवा शक्ती मार्ग अशा विकासाचा कोल्हापूरला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजीला शुदद्ध व मुबलक पाणी देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच, असे सांगत कोल्हापुरात सात एमआयडीसी आहेत. त्यामध्ये उद्योजकांची गुंतवणूक येणार आहे. लाखो रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगत कोल्हापुरातही महायुतीचा भगवा फडकवा, असे आवाहनही त्यांनी केले.

विकासकामांना गती : ना. देसाई

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा खर्‍या अर्थाने चालवला आहे. महाविकास आघाडीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कामे ठप्प झाली होती. त्या कामांना गती ना. शिंदे यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी, प्रामाणिकपणे कर्ज फेडणार्‍यांना अनुदान, जलसंपदा प्रकल्पांना मान्यता, महिलांना एसटी प्रवासात सवलत असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. शिवसेनेच्या महाअधिवेशनात जे ठराव झाले त्याची अंमलबजावणी करून लोकसभेचे राज्यातील मिशन 48 टार्गेट पूर्ण करण्याचे आवाहन केले.

जशास तसे उत्तर द्या : सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गांधी मैदानावरची ही सभा रेकॉर्डब—ेक असल्याचे सांगत टीका करणार्‍यांना भविष्यात जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. तुम्ही टीका करावी, आम्ही विकासकामे करत राहतो, असे विरोधकांना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे काम पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. गल्लीबोळात काही उबाठाचे कार्यकर्ते फिरत आहेत. त्यांनी पोस्टरबाजी न करता सभा कशी असते हे गांधी मैदानात येऊन पाहावे असा टोलाही त्यांनी स्थानिक उबाठा कार्यकर्त्यांना लगावला.

कोल्हापुरात शड्डू ठोकला आहे : माने

कोल्हापूरच्या गांधी मैदानात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शड्डू ठोकला आहे. आता मैदानात कोणीही विरोधक उतरला तरी त्याला चितपट करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये या महाअधिवेशनाच्या माध्यमातून मिळाली आहे. शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांची होती. ती कोणत्याही घराण्याची नव्हती. तीनचाकी रिक्षा चालक आज राज्याचे तीन पक्षांचे स्टेअरिंग हातात घेऊन राज्याच्या विकासाची चाके चांगल्या पद्धतीने हाकत आहे. यावेळी उपस्थितांना हातात मोबाईल टॉर्च लावून उंचावण्यास सांगत ही विजयाची मशाल कायम तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खा. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही निधी मिळत नव्हता आपण ना. एकनाथ शिंदे मुख्यमंंत्री झाल्यानंतर निधी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे सांगितले.

अहोरात्र राबणारे मुख्यमंत्री शिंदे : पाटील

या महाराष्ट्रात आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले, त्यामध्ये अहोरात्र काम करणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार बांधले जात होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन नव्याने शिवसेनेची मोट बांधली. आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या दाढीला हात लावण्याची भाषा करतात. पण शिंदे दाढी करताना त्यातील एक केस जरी पडला असेल तर तो उचलून दाखवण्याचे धाडस दाखवा. तुमच्या घरात येऊन चाकरी करतो, असे आव्हान त्यांनी दिले. गुवाहाटीला गेलो म्हणून आमच्यावर आरोप करता. पण हिंदुत्वाचा विचार शिंदेंच्या खांद्यावर देऊन त्यांच्या मागे आम्ही गेलो. हा विचार शिवसैनिकांना प्रेरणा देणार असून आगामी काळात देशात शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.

व्यासपीठावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यध्यक्ष राजेश क्षीरसागर, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील-यड्रावकर, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, माजी खा. निवेदिता माने, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, चंद्रदीप नरके, ग्रामीण जिल्हा प्रमुख रविंद्र माने, सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, सुहास बाबर, अमोल बाबर यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, सुहास बाबर, दलित पँथरचे सुखदेव सोनवणे, ज्योती वाघमारे यांची भाषणे झाली. यावेळी उबाठा गटाचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news