

अशोक मोराळे
पुणे : 'आमच्या शेठजीला फार दिवसांनी मुलगा झाला आहे..! त्यांनी म्हातार्या बायकांना साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत चला.' 'अहो, तुमच्या मुलाला लॉटरीवर दुचाकी लागली आहे..! ती घेण्यासाठी दहा रुपयांचे तिकीट काढावे लागेल. पैसे देता का?' 'अहो, खाली पडलेली ही धातूची पट्टी तुमची आहे का?' असे बोलून कोणी तुमच्याशी संवाद साधत असेल, तर वेळीच सावध व्हा; अन्यथा तुम्ही त्या टोळीचे शिकार होऊ शकता.
गेल्या काही दिवसांपासून या टोळ्यांनी शहरात लुटीचा सपाटा लावला आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ महिलांना टार्गेट केले जात आहे. एकदा का महिला जाळ्यात अडकली की बोलण्यात गुंतवून प्रलोभन दाखवत अवघ्या काही मिनिटांत अंगावरील दागिने घेऊन ही टोळी पसार होत आहे. हडपसर, भारती विद्यापीठ, सिंहगड, चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडल्या आहेत.
निगडी येथून दिराकडे निघालेल्या एका महिलेला फुरसुंगी परिसरात ठगांनी गाठले. 'तुमच्या मुलाला लॉटरी लागली असून, नवी दुचाकी मिळणार आहे,' असे सांगून त्यांना दुचाकीवर बसवून आपल्या सोबत घेऊन गेले. तेथे दहा रुपयांचे स्टॅम्प तिकीट घेण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, सुटे पैसे नसल्याचे महिलेने सांगताच त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेऊन 'दुचाकी घरी पाठवून देतो,' असे म्हणत पोबारा केला. महिला जेव्हा घरी पोहचली तेव्हा ना दुचाकी आली ना सोन्याच्या बांगड्या परत मिळाल्या.
भारती विद्यापीठ परिसरात भाजी खरेदीसाठी मंडईत निघालेल्या एका महिलेला धातूची पट्टी दाखवून तिच्या अंगावरील दागिने पळविले. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शनिवारी (दि. 5) सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास कीर्तिनगर वडगाव परिसरात एका महिलेला दोघांनी अशाच प्रकारे लुटले. त्यांनी आपल्या शेठजीला मुलगा झाल्याचे सांगून, ते म्हातार्या बायकांना साड्या व पैसे वाटणार आहेत, असे म्हणून महिलेला थांबवत दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगत हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 89 हजारांचे दागिने पळवत त्यांच्याकडे बिस्किटांचे पुडे असलेली बॅग हाती थोपवून पळ काढला.
दरम्यान, रविवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास पाषाण येथे देखील ठगांनी अशाच प्रकारे एका 79 वर्षीय महिलेला आपल्या जाळ्यात खेचून एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन धूम ठोकली. या महिलेला देखील ठगांनी आमच्या शेठला मुलगा झाला आहे, त्यामुळे त्यांनी साड्या व लुगडे वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे, असे सांगितले. मात्र, तुमच्या अंगावर असलेले दागिने घेऊन आमच्या ऑफिसमध्ये आले, तर चालणार नाही, असे सांगून ते एका पिशवीत ठेवण्यास सांगून हातचलाखीने ती चोरी केली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशी आहे टोळीची गुन्ह्याची पद्धत
तीन ते चार व्यक्ती एका टोळीत काम करतात. अंगावर दागिने असलेल्या ज्येष्ठ महिलेला हेरण्यापासून ते दागिने काढून घेतल्यानंतर पळ काढण्यापर्यंतचे प्रत्येकाला वेगळे काम दिल्याचे दिसून येते. प्रत्येकवेळी ही टोळी वेगवेगळ्या भागांतील महिलांना गंडा घालते. हडपसर परिसरात एका महिलेला फसविले. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी भारती विद्यापीठ (कात्रज) परिसरात एका महिलेचे दागिने काढून घेतले. या घटनांना काहीसा कालावधी लोटतो ना लोटतो तोपर्यंतच सिंहगड रोड परिसरात महिलेला फसविले. त्यानंतर बाणेर परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र लंपास केले. प्रामुख्याने ज्येष्ठ महिलांना हेरूनच ही टोळी विविध प्रकारची प्रलोभने दाखवत दागिने चोरी करीत आहे.
फसवणुकीसाठी फंडे बदलले
कोरोनापूर्वीच्या काळात देखील ठगवणुकीच्या अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. कमी पैशात विदेशी चलन देण्याचे प्रलोभन असो की अमेरिकेतून आलेल्या मावशीने डॉलर आणले आहेत, असे सांगून केलेली फसवणूक; तर म्हशीचा चीक देण्याच्या बहाण्याने देखील चोरटे महिलांकडील पैसे व दागिने लुटून पळ काढत होते. आता परत या टोळ्या शहरात चांगल्याच सक्रिय झाल्याचे दिसते.
अशी घ्या काळजी…
अनोळखी व्यक्तीसोबत संवाद करणे टाळा
कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका
घराबाहेर पडताना ज्येष्ठ महिलांनी एकटे बाहेर पडणे टाळावे
शक्यतो मौल्यवान वस्तू सोबत घेऊन बाहेर फिरणे टाळा
आपल्याजवळील दागिने काढून अनोळखी व्यक्तीकडे देऊ नका
लॉटरी, पैसे, कमी पैशांत जास्त दागिने असे कोणी सांगितले तर विश्वास ठेवू नका
संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना माहिती द्या