नवीन उजव्या कालव्यालगत मंदिरे, शेड अन् गॅरेजही; जमिनीवर बेकायदा कब्जा

नवीन उजव्या कालव्यालगत मंदिरे, शेड अन् गॅरेजही; जमिनीवर बेकायदा कब्जा
Published on
Updated on

शिवाजी शिंदे

पुणे : कालव्याच्या दोन्ही बाजूंना कालवा दुरुस्तीसाठी मोकळी जागा सोडणे आवश्यक असतानाही शहरातून जाणार्‍या मुठा उजव्या कालव्यालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याचे 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत आढळून आले. या जागेचा वापर राजकीय प्रतिनिधींच्या, तसेच सामाजिक म्हणवणार्‍या संस्थांच्या कार्यालयांपासून थेट गॅरेजपर्यंत आणि पत्र्याच्या शेडपासून ते झोपड्या, तसेच मंदिरांपर्यंत होत असल्याचे दिसून आले. जलसंपदा विभाग केवळ नोटिसांच्या कागदी खेळापलीकडे ठोस काहीही कारवाई करत नसल्याने अतिक्रमणे वाढली आहेत.

खडकवासला धरणापासून तीन कालवे निघतात. धरणाच्या भिंतीकडे पाठ करून पुण्याच्या दिशेने उभे राहिले असताना उजवीकडून जाणारा मुख्य उजवा कालवा, त्याच्या शेजारून जाणारा बेबी कालवा आणि डावीकडून जाणारा डावा कालवा. हे तीनही कालवे पुण्यात येतात.

त्यातील सोळाशे क्युसेक क्षमतेचा उजवा कालवा हा प्रथम पर्वती पायथ्यालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणि तेथून लष्कर भागातील लष्कर जलकेंद्रमार्गे थेट इंदापूरपर्यंत जातो. या एकूण 205 किलोमीटरच्या कालव्यातील पहिल्या 34 किलोमीटरचा भाग हा खडकवासला, सिंहगड रस्ता, पुणे शहर, रेसकोर्स, हडपसर, माळवाडी मार्गे हवेलीतील गावांतून पुढे जातो. शहरालगतच्या आणि शहरातून जाणार्‍या कालव्यालगत अतिक्रमणांचे प्रमाण मोठे आहे.

काय आढळले पाहणीत ?

नांदेड फाटा ते जनता वसाहत… (पहिला टप्पा)
खडकवासला धरणापासून सुरू होणार्‍या नवीन उजवा मुठा कालव्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यातच कालव्याचे अस्तरीकरण झाले नसल्यामुळे बहुतांश ठिकाणी गळती वाढलेली दिसून येत आहे. गळती आणि अतिक्रमणामुळे या कालव्याची वाताहत झालेली आहे.

कालव्याच्या शेजारी असलेल्या जलसंपदाच्या मोकळ्या जागेत पत्रा शेड टाकून रस्ता बंद केल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यात विशेषत: नांदेड पूल परिसराबरोबरच सारसबाग भागापर्यंत अक्षरश: काही राजकीय आणि सामाजिक संघटनांची अतिक्रमणे जास्त असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी कालव्यात उतरण्यासाठी घाट तयार केले आहेत. हा प्रकार जनता वसाहत भागात जास्त दिसून आला.

या प्रकारामुळे कालव्यात कपडे धुणे, गाड्या धुणे, काही ठिकाणी चक्क जनावरे धुतली जात असल्याचे दिसून आले.वडगाव धायरी, जनता वसाहत परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधींनी कालव्याच्या रस्त्यावर कमानी उभारून स्वत:ची आणि राजकीय पक्षांची जाहिरात केली आहे. काहींनी रस्ता काबीज करून त्यावर कार्यालये थाटली आहेत. रस्त्यावर वाहने लावून रस्ता अडविण्याचे प्रकार जनता वसाहत भागात जास्त आहेत. याबरोबरच रस्त्यावरच पत्र्याचे शेड टाकून नागरिक राहत असल्याचे जनता वसाहतीमध्ये दिसून आले.

सारसबाग परिसरात कालव्याच्या जागेवर अतिक्रमण करून मंदिरे उभारली आहेत. ही मंदिरे पक्क्या स्वरूपाची आहेत. याबरोबरच या भागांत शहरातील काही सामाजिक संघटनांनी कालव्याचा रस्ता पूर्णपणे अडविला आहे. त्यामध्ये फायबरचे तयार घर ठेवले आहे. तसेच कालव्याच्या रस्त्यावर गेट तयार करून त्यास टाळे ठोकले आहे. मोक्याच्या ठिकाणी हा प्रकार सर्रासपणे केला आहे. कालव्याच्या शेजारी असलेल्या खंडोबा मंदिराच्या मागील बाजूस पत्राशेड ठोकून रस्ता अडविला आहे.

डायस प्लॉट ते हडपसर माळवाडी (दुसरा टप्पा)
नवीन उजवा कालवा डायल प्लॉट (स्वारगेट) ते हडपसर माळवाडी या भागात अतिक्रमणांचा विळखा घातला आहे. डायस प्लॉट भागात कालव्याच्या रस्त्यावर गेट तयार केले आहे. तसेच, त्यास टाळे ठोकले आहे. एका नागरिकाने तर चक्क गॅरेज सुरू केले आहे. विशेष म्हणजे या गॅरेजमध्ये वीजमीटर असल्याचे दिसून आले. शंकरशेठ रोडवर असलेल्या कालव्याच्या परिसरात पक्की घरे, तसेच एका बिल्डरने पत्रा शेड ठोकून कमगारांना राहण्यासाठी जागा केली आहे.

रेसकोर्स परिसर (भैरोबा नाला) या भागात कालव्यावरील रस्त्यावर पक्की घरे, चहाच्या टपर्‍या, फळ विक्रेते यांची अतिक्रमणे वाढली आहेत. येथेही एका राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधीने कालव्यावर कमान उभारली आहे. त्यासाठी महापालिकेचा निधी खर्च केला आहे. छोट्या मंदिरांचे प्रमाण या भागात जास्त असल्याचे दिसून आले. तसेच पत्रा शेड ठोकून जागा अडविण्याचे प्रमाण या भागात जास्त आहे.

महापालिकेची साथ हवी
नवीन उजवा मुठा कालव्याच्या आसपास विशेषत: 34 किलोमीटर (शहरातून वाहणार्‍या मुख्य भागात) या भागात 129 हेक्टरवर अतिक्रमणे आहेत. म्हणजेच किमान 15 ते 20 टक्के अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी अनेकवेळा नोटिसा पाठविल्या. त्यानंतर अनेक वेळा कारवाई केली. मात्र, पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती होत आहे. 2000 सालानंतरची अतिक्रमणे हटवू नयेत, असा उच्च न्यायलयाचा आदेश असल्यामुळे काही समस्या निर्माण होत आहेत. तसेच, अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलिसांचे सहकार्य घ्यावे लागते.

मात्र, या दोन्ही आस्थापनांचे सहकार्य एकत्र तारीख मिळणे बहुतांश वेळा अवघड असते. त्यामुळे जलसंपदाच्या जागेत झोपडी उभा राहिली की, लागलीच स्थानिक लोकप्रतिनिधी सुविधा पुरवितात, तर महावितरण विजेची सोय करते. ही अतिक्रमणे काढून जलसंपदाच्या ठराविक जागेत अतिक्रमित नागरिकांचे पुनर्वसन केल्यास त्यांच्या राहण्याची सोय होऊ शकते.

तसेच उर्वरित जागा जलसंपदास मिळू शकते. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महापालिका आस्थापना आणि जलसंपदाच्या अधिका-यांनी एकत्र यावे लागेल. त्यासाठी एस.आर.ए. स्कीम करता येऊ शकते. परंतु, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सर्वेक्षण करणे गरजेचे आहे, अशी माहिती खडकवासला साखळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

जलसंपदाचे कागदी घोडे
कालव्याच्या अतिक्रमणाची काही उदाहरणे 'पुढारी'ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केल्यावर जलसंपदा विभागाने संबंधितांना नोटीस दिल्या. तसेच, नोटीस देताना पत्रकार आमच्याकडे विचारणा करतात, म्हणून आम्हाला नोटिसा द्याव्या लागतात, अशा शब्दांत त्यांची समजूतही काढल्याचे समजते.

बेबी कालव्याची अवस्था दयनीय
खडकवासला धरणापासून निघणार्‍या बेबी कालव्यात जलवाहिनी टाकण्याची बंद नळ योजना नव्वदीच्या दशकात पुढे आली. त्यामुळे पर्वती जलकेंद्रापर्यंत या कालव्यात जलवाहिनी असून, त्यापुढील कालव्याचा सध्या वापर होत नाही. त्याचा गैरफायदा घेत या कालव्यात शिंदेवस्ती येथे राडारोडा टाकून कालवा बुजविण्याचे काम जोरात सुरू आहे. तसेच याच भागात कालव्याच्या जागेत अगदी खोलगट भागात पक्क्या झोपड्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे या कालव्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिंदेवस्ती भागात हे प्रमाण जास्त आहे.

हडपसर ते माळवाडी या भागात बेबी कालव्यास कुंपण घातले आहे. मात्र, या कालव्याच्या रस्त्यावर पक्का रस्ता केला आहे. संपूर्ण कालवा मुख्य रस्त्यांच्या मधोमध जात असल्याने त्या जमिनीना सोन्याचा भाव आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कालव्यालगतच्या बहुतांश जमिनींवर काही नेत्यांच्या मदतीने कब्जे केले जात असल्याचे समोर आले आहे.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या, उद्योग आणि नव्याने उभ्या राहत असलेल्या वसाहतींची गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने खडकवासला साखळी प्रकल्पांतर्गत चार धरणे बांधली या धरणांचे पाणी कालव्याव्दारे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, हवेली आणि बारामतीच्या काही भागांपर्यंत पोहोचवले. जेव्हा कालवे बांधले त्या वेळी त्याच्या आसपासचा परिसर विकसित झाला नव्हता.

आता हा नवीन उजवा मुठा कालवा पुणे शहरातून वाहत आहे. त्यामुळे या कालव्यालगतच्या सर्व जमिनींवर मुख्य रस्त्यावर आल्याने त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. हीच बाब हेरून मागील काही वर्षांपासून कालव्यालगतच्या जमिनींवर ताबा मारून झोपड्या उभारल्या गेल्या. त्यानंतर मोक्याच्या मोकळ्या असलेल्या जागांवर काही नेत्यांच्या मदतीने गेट बसवून, पत्रे ठोकून ताबा मारला जात असल्याचे पाहणीतून समोर आले आहे.

कालव्याच्या मुख्य भरावापासून किती अंतर सोडावे याबाबत निश्चित असे धोरण नाही. मात्र, कालव्याच्या भरावाच्या उंचीनुसार जागा सोडावी लागते. जेणेकरून कालव्याची दुरुस्ती करणे सोपे व्हावे.

       – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला साखळी प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news