Share Market मध्ये विक्रीचा दबाव! FIIs नी १५ दिवसांत १५ हजार कोटी काढून घेतले, ‘या’ २ क्षेत्रांना मोठा फटका

Share Market मध्ये विक्रीचा दबाव! FIIs नी १५ दिवसांत १५ हजार कोटी काढून घेतले, ‘या’ २ क्षेत्रांना मोठा फटका
Published on
Updated on

Share Market Updates : आर्थिक मंदीचे सावट आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक धोरणाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरवाढीबाबतच्या भूमिकेच्या भीतीने तसेच प्रमुख कंपन्यांच्या कॉर्पोरेट कमाईच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे. याचा मागोवा घेत शुक्रवारी (दि.२०) भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांनी सावध सुरुवात केली होती. सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीने स्थिर पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांत घसरण झाली. सेन्सेक्स २३६ अंकांनी घसरून ६०,६२१ वर बंद झाला. तर निफ्टी १८,०२७ वर स्थिरावला.

त्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा दबाव राहिल्याने बाजाराला मोठा फटका बसला आहे. द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) २०२३ वर्षाच्या सुरुवातीच्या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारातून १५ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. मुख्यतः आयटी आणि फायनान्सियल सेक्टरमध्ये जोरदार विक्री दिसून आली आहे. या दोन्ही क्षेत्रातील शेअर्स विक्री ही सुमारे १०,१५८ कोटींची आहे.

NSDL डेटानुसार, भारतातील FII ची बहुतांश गुंतवणूक या दोन क्षेत्रांत आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यादरम्यान, FII ची फायनान्सियल क्षेत्रातील निव्वळ विक्री ६,७०१ कोटी रुपयांची होती. तर परदेशी गुंतवणूकदारांनी ३,४५७ कोटी रुपयांचे IT शेअर्स विकले आहेत.

'हे' होते टॉप गेनर्स

दरम्यान, भारतीय शेअर बाजार आज शुक्रवारी (दि.२०) स्थिर पातळीवर खुला झाला होता. त्यानंतर त्यात घसरण झाली. आजच्या व्यवहारात इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, कोल इंडिया, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचसीएल टेक, आयटीसी आणि विप्रो हे टॉप गेनर्स होते. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, अपोलो हॉस्पिटल्स, एसबीआय लाईफ, भारती एअरटेल, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स घसरले होते.

क्षेत्रीय निर्देशांकांचा संमिश्र व्यवहार

क्षेत्रीय निर्देशांकांनी आज संमिश्र व्यवहार केला. बँक निफ्टी ०.७५ टक्के आणि निफ्टी आयटी ०.२५ टक्के वाढला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ०.८० टक्क्याने वधारला. तर निफ्टी ऑटो ०.१६ टक्क्याने खाली आला होता.

कॉफोर्जचे शेअर्स ७ टक्क्यांनी वाढले

आयटी फर्म कॉफोर्जने डिसेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीतील कमाईची घोषणा केल्यानंतर आज कॉफोर्जचे शेअर्स ७ टक्क्यांनी वाढले. कॉफोर्ज शेअर बीएसईवर मागील बंदच्या तुलनेत ६.९ टक्के वाढून ४,२४० रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरचा हा उच्चांक आहे. डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत चांगली कामगिरी नोंदवली असतानाही हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरले. टाटा मोटर्सचे शेअरही २ टक्क्यांनी वधारले.

अमेरिकेतील बाजारातही विक्रीचा दबाव

बहुतांश आशियाई शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. तर अमेरिकी डॉलर मे महिन्यापासूनच्या सर्वात कमकुवत पातळीच्या जवळ पोहोचला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करणार असल्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी जागतिक मंदीच्या जोखमीची धास्ती घेतली आहे. यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला आहे. परिणामी एस अँड पी ५०० हा निर्देशांक ०.७६ टक्क्यांनी घसरला.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली असली तरी आशियाई बाजारांनी काही प्रमाणात लवचिकता दाखवली. आशियाई बाजारात संमिश्र वातावरण राहिले. जपानचा टॉपिक्स निर्देशांक ०.५ टक्क्याने ‍वधारला. हाँगकाँगचा हँग सेंग १.१ टक्के आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.६ टक्क्यानी वाढला. (Share Market Updates)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news