Sharad Pawar | शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर, हे सरकार महागाई वाढविणारे

Sharad Pawar |  शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर, हे सरकार महागाई वाढविणारे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज गुरुवारी (दि. १४) नाशिकमध्ये दाखल  होत चांदवडमध्ये जाहीर सभा घेत आहे. त्यांच्यासमवेत खासदार शरद पवार व संजय राऊत उपस्थित झाले आहेत. राहुल गांधी यांच्या मुक्तसंवादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

महाविकास आघाडीची चांदवड येथे होत असलेल्या सभेत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची चांदवड येथे सभा पार पडली. या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील सध्य परिस्थितीवर भाष्य करत केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. तसेच देशात युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांसाठी ७० हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी करण्यात आली होती. त्या घटनेची आठवण काढत शरद पवार यांनी सांगितले की, आज शेतकरी संकटात आहे, पण या सरकारचे त्याकडे लक्षच नाही. सत्तेतील सरकार शेतकरी विरोधी असून महागाई वाढविणारे आहे, त्यामुळे या सरकारला येथून हटवणे हे तुमचे आमचे काम आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर
सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून त्यास एकमेव कारण म्हणजे देशाची सत्ता हाती असणारे सत्ताधारी लोक आहेत. शेती आणि शेतकरी यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो, तेव्हा एक दिवस याच चांदवडला देखील माझी सभा होती. मात्र त्यावेळी दिल्लीला काद्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याने सरळ दिल्ली गाठायला लागली.  तेव्हा आज जे सत्तेत आहेत, ते कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेच्या सभागृहात आले आणि कांद्यांचे भाव खूप वाढले आहेत, आम्हाला जगणे मुश्किल झाले आहे, अशा प्रकारच्या घोषणा देत होते.

माझ्या उत्तराच्या भाषणात मी त्यांना सांगितले की, कांदा हे जिरायत शेतकऱ्यांचे पीक आहे. कांद्याचे उत्पन्न आणि त्यावरील खर्च पाहिल्यांवर कांद्यांला जास्त किंमत द्यायलाच हवी. पण ही जास्त किंमत देऊ नये म्हणून भाजपाने कांद्याच्या माळा घातल्या होत्या. तेव्हा त्यांना सांगितले होते की, तुम्ही कांद्याच्या माळा घाला किंवा कवड्याच्या माळा घाला. कधी नाही ते शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत आहेत, त्यामुळे कांद्याच्या भावामध्ये अजिबात कपात करणार नाही", अशी आठवण शरद पवार यांनी चांदवडच्या सभेत सांगितली.

युपीए सरकारच्या काळातील निर्णयामुळे तत्काळ शेतकऱ्यांचे कर्ज माफ
आत्ताच्या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही आस्था नाही. त्याचा परिणाम संपूर्ण देशात दिसून येत आहे. शेतकरी देशभर आंदोलन करत असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. युपीए सरकारच्या काळातील आठवण सांगतांना पवार यांनी सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही तेथे गेलो, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या पत्नीला विचारले होत, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तेव्हा तीने सांगितले की, मुलीचे लग्न ठरले होते, त्यात बँकेचे कर्ज व सावकाराचे पण कर्ज होते. मुलीचे लग्न ठरल्यानंतर बँकेने नोटीस पाठवली होती. कर्ज फेडायला उशीर झाला म्हणून घरातील भांडी बाहेर काढल्याने मुलीचे लग्न मोडले. मुलीचे लग्न मोडल्याने तिच्या बापाला हे सहन झाले नाही  आणि त्याने आत्महत्या केली. या भावनिक घटनेमुळे आम्ही दिल्ली येथे गेलो. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आणि नंतर ठरवण्यात आले की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे. त्यावेळी मत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि ७० हजार कोटींचे कर्ज एकदम माफ केले. असे शरद पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news