Sharad Pawar : “मला आठवतंय त्या काळात…” शरद पवारांनी सांगितली आठवण

Sharad Pawar
Sharad Pawar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मुंबईतील कळंबोली येथे आयोजित 'स्वाभिमान सभा' झाली.  या सभेला शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला संघटना राज्यप्रमुख ॲड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.  यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत असताना  शरद पवार यांनी एक आठवण सांगितली आहे. (Sharad Pawar)

Sharad Pawar : "स्थानिक लोकांना उध्वस्त…"

शऱद पवार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,

"आजचा हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. काही नवीन प्रश्न निर्माण झालेत त्यासाठी राज्य सरकारला विश्वासात घेऊन बैठक करावी लागेल आणि स्थानिक लोकांच्या जमिनी वाचतील कशा, भूमिपुत्रांना उध्वस्त करणारे काही प्रकल्प यामधून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करावा लागेल; या सर्व भागांमध्ये राज्याच्या भल्यासाठी उन्हा-तान्हाचा विचार न करता घाम करणारा जो माथाडी कामगार आहे त्यांना घरं दिली पण, त्या घराची आजची अवस्था ही बघितल्यानंतर इथे अधिक काहीतरी काम करण्याची गरज आहे, याची खात्री ही आपल्या सगळ्यांना आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत, या गोष्टीचा विचार आजच्या या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात मांडला.

मला आठवतंय त्या काळात मी राज्यामध्ये राज्य मंत्रीपदाचे काम करत होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि सिडकोचा प्रकल्प हा करण्याबद्दलचा निर्णय झाला, नंतरच्या काळामध्ये माझ्याकडे विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आली आणि ती आल्यानंतर या भागातल्या भूमी पुत्रांचे अनेक प्रश्न आम्हा लोकांच्या कानावर आले. मला आठवतंय की, या भागामध्ये त्या वेळेचे आमचे सहकारी डी. बी. पाटील, दत्ता पाटील, डी. एन. पाटील, अनेकांची नावे घेता येतील या सगळ्यांनी इथल्या भूमिपुत्रांचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला आणि त्याला साथ आम्ही लोकांनी दिली आणि आज या ठिकाणी त्याचे उत्तर पाहायला मिळत आहे, पण मला आठवतंय की, सिडकोची उभारणी होण्याच्या काळामध्ये या भागामध्ये दत्ता पाटील असो, डी. बी. पाटील असो, अन्य सहकारी यांच्याबरोबर आम्ही लोक मैलमैंल या भागात फिरलो, बाधांवर फिरलो, इमारती नव्हत्या, भाताचं पीक होतं आणि सबंध शेतकरी उध्वस्त होईल अशा प्रकारची भीती ही त्या ठिकाणी निर्माण झाली होती. (Sharad Pawar)
पुन्हा एकदा सत्ता माझ्याकडे आली आणि सत्ता आल्यानंतर पहिला निकाल हा घेतला की, एकंदर जर विकासासाठी या भागात जमीन सिडकोसाठी घेतलेली असेल त्यातली साडेबारा टक्के जमीन ही काढून त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये देऊन त्यांना दोन पैसे मिळतील अशा प्रकारचा निर्णय घेतला; त्याचा फायदा या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी केला, पण आज पुन्हा एकदा नवीन प्रश्न निर्माण झाले ते म्हणजे, तो नयना प्रकल्प असो, सिडकोच्या काही गोष्टी असो या सर्वांचा विचार करायची वेळ आली.

प्रकल्प आणि विकास याला लोकांचा विरोध नसतो पण, स्थानिक लोकांना उध्वस्त करून विकास ही जी संकल्पना पूर्ण करायची असेल तर ती गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. मी स्थानिक लोकांना एवढी खात्री देऊ इच्छितो की, देशाचे पार्लमेंटचे अधिवेशन चालू आहे ते १० दिवसात संपेल आणि ते अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या नयना प्रकल्पासाठी जी काही तुमची मागणी असेल त्याची पूर्तता करायला जी काही आवश्यकता असेल त्यात तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्या बरोबर आहोत, हे या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. काही करायची गरज नाही; हा विकास याचा अर्थ स्थानिक माणूस उध्वस्त नव्हे, हा विकास याचा अर्थ स्थानिक माणसाच्या संसारामध्ये सुधारणा झाली ही स्थिती आज आपल्या सगळ्यांना निर्माण करायची आहे.

आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. आजच मी वर्तमानपत्रात वाचले तुम्ही ही कदाचित वाचले असेल, आज देशाचे प्रधानमंत्री सुरतला गेले; कशासाठी गेले ? देशातला सगळ्यात मोठा हिऱ्यांचा प्रकल्प आज त्याचे उद्घाटन सुरत मध्ये ते करत होते. तुम्हाला माहित असेल नसेल, ही जी मुंबई आहे आणि मुंबई मधला बीकेसी म्हणून जो भाग आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम आणि हिरे व्यवहार इथे करून हजारो लोकांना काम देण्याचा निर्णय आम्ही घेतला. तिथल्या लोकांना जमीन दिल्या आणि जमीन देताना फक्त एक रुपयाला तिथे जमीन दिल्या आणि हजारो लोकांना तिथे काम मिळाले. आनंद झाला मला कारण, लोकांना काम मिळालं पण, आज देशाचे प्रधानमंत्री इथे काय होतं याचा विचार करत नाही. इथे जे झाले ते सुरतला कसं नेता येईल याचा विचार करत आहेत आणि इथल्या पेक्षा मोठा प्रकल्प तिकडे कसा जाईल याची काळजी ते त्या ठिकाणी घेत आहेत. देशाचा विचार करण्याची दूरदृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही त्याच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे, ही भूमिका आज आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि एकजुटीने आपल्या भल्याचा विचार या ठिकाणी करावा लागेल. मी हे मुद्दाम सांगू इच्छितो, आणखीन अनेक गोष्टी आहेत मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. (Sharad Pawar)
मला आनंद आहे या भागामध्ये सातारा असो, खटाव असो या भागातले लोक सुद्धा आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी अतिशय कष्ट करण्याचे काम एका महान नेत्यांनी केलं, त्या महान नेत्याचे नाव यशवंतराव चव्हाण आहे आणि त्या यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन इथे कष्ट करणारा वर्ग हा या ठिकाणी आहे. माझी खात्री आहे हा सर्व आमचा घटक घाम गाळेल, कष्ट करेल इथल्या लोकांच्या जिवाभावाची सवलत होईल आणि हा सबंध भाग प्रगतीच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी जे काही योगदान द्यावे लागेल ते योगदान देईल. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र..!
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news