

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आजच्या रॅलीच्या गर्दीवरून निवडणुकीचा निकाल काय असेल हे स्पष्ट होते, असे शाहू महाराज यांनी सांगितले. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर बोलताना त्यांनी रयत आपल्या सोबत होती, असे सांगत ही निवडणूक रयतेची आहे, असे म्हणणार्या महायुतीला टोला लगावला.
शाहू महाराज म्हणाले, आपली उमेदवारी जनतेतून आली आहे. आज रॅलीत जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहरासह ग्रामीण भागातूनही लोक आले होते. रॅलीत सहभागी झालेल्या जनसमुदायावरून ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे हे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराज यांची उमेदवारी अत्यंत उत्साहात दाखल झाली आहे. जनतेचा उत्साह पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे कोल्हापुरातील जनमत ओसंडून वाहताना ऐतिहासिक दसरा चौकात पहावयास मिळाले. उमेदवाराची निष्क्रियता त्यांच्याच पक्षाला मान्य नाही, उमेदवारीबद्दल भाजपचे महेश जाधव काय म्हणाले हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज भरताना यापूर्वी एवढा उत्साह कधी दिसला नाही. रॅलीला झालेली गर्दी पाहून लोकांच्या मनामध्ये काय आहे ते दिसून येते. लोकांना बदल हवा आहे हेच आजच्या गर्दीवरून दिसून येते. दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत आहे, परंतु त्याचा काही परिणाम होणार नाही. लोकांना ते मान्य नाही. त्यामुळे कोण काय बोलतंय याकडे आम्ही लक्ष देणार नाही. आम्ही आमची विचारधारा व सकारात्मकृष्ट्या विकासाची भूमिका मतदारांसमोर मांडत असल्याने शाहू महाराज यांच्या पाठीशी जनता भक्कमपणे उभा असल्याचे या रॅलीवरून दिसून येते, असे मालोजीराजे यांनी सांगितले. प्रचारात आपण खूष आहोत. आपण जनतेबरोबर आहे यातच मी समाधानी आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, उमेदवाराबाबतची नाराजी काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 48 तास कोल्हापुरात थांबावे लागले. मुख्यमंत्री नेत्यांचे पॅचअप करतील परंतु जनतेचे पॅचअप ते करू शकणार नाहीत. जनतेतला उमेदवार म्हणून शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खर्या अर्थाने आज रयत रस्त्यावर उतरली आहे.