

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट आशिया कप२०२३ पाकिस्तानमध्ये होणार का, यावरुन सध्या खल सुरु आहे. या मुद्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय ) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी ) आमने-सामने आले आहेत. ( Asia Cup Row ) पाकिस्तानमध्ये आशिया कप स्पर्धा घेण्याऐवजी तटस्थ देशामध्ये ही स्पर्धा घेण्यात यावी, असे मत आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी स्पष्ट केले आहे. तर पाकिस्तानमध्येच ही स्पर्धा घेण्यात यावी, असे पीसीबीची मागणी आहे. या स्पर्धेवरुन आजपर्यंत दोन्ही देशातील माजी क्रिकेटपटूंकडून अनेक विधाने झाली आहेत. आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही आपलं मत व्यक्त केले आहे.
पाकिस्तानमधील लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेवेळी शाहिद आफ्रिदीने सांगितले की, "काही वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाला भारतात खेळू नये, यासाठी धमकी मिळाली होती. तरीही पाकिस्तानचा संघ भारतात गेला. आम्ही सामने खेळले. कोणी तरी धमकी देते म्हणून दोन्ही संघांमधील संबंध बिघडले जावू नयेत. आता जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येवून खेळण्यास तयार झाला तर त्याचे स्वागतच आहे. आमचा देश टीम इंडियाची काळजी घेईल. भारतीय संघाचा आम्ही सन्मान करु. ही पाकिस्तान सरकारची जबाबदारी असेल"
भारतीय संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास आला तर हे दोन्ही देशांच्या क्रिकेटसाठी एक मोठे पाऊल ठरले. सध्याची पिढी ही युद्ध आणि संघर्षाची नाही. आम्हाला भारताबरोबर चांगले संबंध हवे आहेत. भारताविरुद्ध आम्ही अनेक सामने खेळलो आहोत. आम्ही भारतात सामने खेळण्यासाठी गेलो तेव्हा तेथील क्रिकेटप्रेमींकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होते. भारतीय संघ २००५ मध्ये पाकिस्तान दौर्यावर आला होता. तेव्हा हरभजन आणि युवराज शॉपिंग आणि रेस्टॉरंटमध्ये जायचे त्यावेळी कोणीही त्यांच्याकडून पैसे घेत नव्हते. हे दोन्ही देशांमधील संबंधांचे प्रतीकच होते, असेही आफ्रिदी याने सांगितले.
हेही वाचा :