

जामखेड (नगर), पुढारी वृत्तसेवा: कला केंद्र चालकांना हप्ता मागितल्यावर तो न दिल्याने शहरातील तीन कला केंद्रावर सात ते आठ जणांच्या टोळीने धुडगूस घालत लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने साहित्यांची तोडफोड करत दगडफेक केली. या प्रकरणी एकुण सात ते आठ जणांवर जामखेड पोलीस स्टेशनमध्ये खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अक्षय उर्फ चिंग्या मोरे, तुषार पवार, सोम्या पवार व इतर चार ते पाच अनोळखी युवक अशा एकुण सात ते आठ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी झंकार सांस्कृतिक कला केंद्र, जगदंबा सांस्कृतिक कला केंद्र आणि भाग्यश्री कला केंद्र या तीन कला केंद्रावर येऊन म्हणाले की, तुम्हाला कला केंद्र चालवायचे असतील, तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. मात्र, कलाकेंद्र चालकांनी हप्ता देण्यात नकार दिल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने या तिन्ही कलाकेंद्रावर धुडगूस घालण्यास सुरूवात केली. यानंतर या आरोपींनी कला केंद्राच्या खिडक्यांवर दगडफेक केली. तसेच काही आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने कला केंद्रातील खुर्च्या, कुलर, गाड्या आणि पीओपीची मोडतोड करत नुकसान केले.
आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी कलाकेंद्राच्या चालक लता शालन जाधव, कलावंतीनी निता खवळे बारामतीकर आणि शारदा खवळे बारामतीकर या तिघी जखमी झाल्या. तसेच आरोपींचे टोळके यावर न थांबता कलाकेंद्र चालकांना जाताना म्हणाले की, तुम्ही जर आता हप्ता दिला नाही तर तुम्हाला बघून घेऊ. तसेच त्यांनी केंद्र चालकांना शिवीगाळही केली.
या प्रकरणी फिर्यादी लता शालन जाधव (वय ५५) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सात ते आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.