

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसंस्था : Chickenpox New Variant : भारतात चिकनपॉक्सचा (कांजण्या) नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे, ज्याचा फैलाव होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या अहवालानुसार, देशात पहिल्यांदाच व्हेरिसेला झोस्टर व्हायरस (VZV) मुळे चिकन पॉक्स होत असल्याचे समोर आले आहे. चिकन पॉक्सच्या या नवीन व्हेरिएंटला क्लेड 9 असे नाव देण्यात आले आहे. मंकी पॉक्सने ग्रस्त असलेल्या संशयित व्यक्तींच्या नमुन्यांची चाचणी करताना प्रयोगशाळेत हा महत्त्वाचा खुलासा झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तपासणीदरम्यान संशोधकांना बफेलो पॉक्स आणि एन्टरोव्हायरस असलेले नमुने देखील सापडले.
वास्तविक, व्हेरिसेला झोस्टर या विषाणूमुळे चिकन पॉक्सचा संसर्ग होतो. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिकनपॉक्सचा फैलाव वेगाने होतो. खोकला किंवा शिंकण्याद्वारे त्याच्या संसर्ग होऊ शकतो. या विषाणूमुळे, 10 दिवस ते 3 आठवडे शरीरावर पुरळ दिसू शकतात. आतापर्यंत अमेरिका, इंग्लंड, जर्मनी इत्यादी अनेक देशांमध्ये व्हेरिसेला झोस्टर व्हायरस पसरला आहे. मात्र, ही समस्या भारतातही सामान्य आहे. अनेकांना चिकन पॉक्सचा संसर्ग होतो, पण 2023 मध्ये भारतात प्रथमच चिकन पॉक्सच्या क्लेड 9 प्रकाराची पुष्टी झाली आहे. यापूर्वी, या प्रकारातील क्लेड 1 आणि क्लेड 5 ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. क्लेड 9 हा व्हेरिएंट पूर्णपणे नवीन आहे. त्याचा संसर्ग देशातील अनेक राज्यांमध्ये झाला आहे. दरम्यान, एनल्स ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की चिकन पॉक्सच्या वाढत्या जागतिक प्रसारामुळे भारताने आपली दक्षता वाढवली आहे. विविध राज्यांमध्ये संशयित रुग्णांचे नमुने बारकाईने तपासले जात आहेत. दरम्यान, चिकनपॉक्सचा नवा प्रकार भारतात सापडल्यापासून आरोग्य तज्ज्ञांनी उपचारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या नवीन व्हेरिएंटच्या संसर्गाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. हा विषाणू रुग्णाच्या शरीरात दिसण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतात. प्रथम, शरीरावर विशेषतः छाती आणि चेहऱ्यावर पुरळ उठू लागतात. यानंतर, संपूर्ण शरीरावर पुरळ दिसू लागतात. हे पुरळ लहान आणि पाण्याने भरलेले असतात. शरिराला खाजही सुटके. रुग्णाला ताप येतो. या काळात अंगदुखी आणि डोकेदुखीने रुग्ण त्रस्त होतो. रुग्णाची भूक कमी होते आणि त्याला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. जर एखाद्याच्या बाबतीत असे घडत असेल तर त्याने विलंब न करता तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
चिकनपॉक्स (कांजण्या) हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याच्या संसर्गामुळे शरीरावर लाल पुरळ येतात. त्वचेला खाज सुटते. याच्यावर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण आहे. याशिवाय स्वच्छता राखणे गरजेचे आहे. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात धुवा. खोकताना आणि शिंकताना स्वतःला काळजी घ्या. लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. (Chickenpox New Variant)