मणिपूरमध्ये शाळा जाळली; 1 ठार

file photo
file photo
Published on
Updated on

इंफाळ, वृत्तसंस्था : मणिपूरमधील हिंसाचाराचा वणवा थांबण्याचे नाव घेत नसून, चुराचांदपूरनजीक दोन गटांच्या तुंबळ चकमकीनंतर एक शाळाच जाळून टाकण्यात आली; तर एकास गोळी घालून ठार करण्यात आले. तिकडे मिझोराममधून मैतेईंचे स्थलांतर सुरू झाल्यानंतर आसाममधील मैतेईंच्या संघटनेने मिझो कुकींना आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता मणिपूरचा वणवा इतर राज्यांत भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, नग्न धिंड प्रकरणात चार नराधमांना 11 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

चुराचांदपूर आणि बिष्णुपूर यांच्या सीमेवरील भागात शनिवारी कुकी आणि मैतेईंचे सशस्त्र गट एकमेकांना भिडले. त्यांनी आसपासची काही घरे जाळून टाकली व एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू केले. एका शाळेच्या परिसरात हा संघर्ष रविवार सकाळपर्यंत सुरू होता. यात एका गटाने पेट्रोल ओतून व बॉम्ब फेकत शाळाच पेटवून दिली.

त्यात शाळेची तीन मजली इमारत जळून खाक झाली. या आगीत शाळेचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यात पुस्तके, फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या भागात प्रारंभीपासून प्रचंड हिंसाचार होत असल्याने शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना याआधीच घरी पाठवण्यात आल्याने प्राणहानी टळली. बिष्णुपूरजवळच्या एका खेड्यात गावकर्‍यांनी संरक्षणासाठी उभारलेल्या एका बंकरवर हल्ला करीत जमावाने त्यातील एका गावकर्‍याला गोळ्या घालून ठार केले.

स्थलांतराला वेग

मिझोराममधील माजी दहशतवाद्यांच्या संघटनेने तेथील मैतेईंना तत्काळ राज्य सोडण्याची धमकी दिल्यानंतर मिझोराममधून बाहेर पडण्याची मैतेईंची धडपड सुरू झाली आहे. एकूण 41 मैतेई आपापल्या वाहनांनी आसामात पोहोचल्याचे आसाम सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या सर्वांना सिल्चरनजीकच्या लखिपूर येथे एका इमारतीत ठेवण्यात आले असून, तेथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मिझोराममधील 57 मैतेईंनी विमानाने राज्य सोडले असून, अनेक जणांनी रविवारी दुपारपासून मिझोरामच्या बाहेर जाण्याचा प्रवास सुरू केला आहे. मिझोराम सरकारने मैतेईंना पूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिल्यानंतरही भीतीमुळे हे स्थलांतर सुरू झाले आहे. मिझोराममधील मैतेईंना विमानाने मणिपुरात आणण्याची तयारी मणिपूरच्या सरकारने दाखवली आहे.

आसाममधील मिझो कुकींना राज्य सोडण्याचा इशारा

आसाममधील ऑल आसाम मणिपूर स्टुडंटस् युनियन या मैतेईंच्या संघटनेने आसामच्या बराक व्हॅलीतील मैतेईबहुल भागातून मिझो कुकींना परत जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर आसाम सोडावे; अन्यथा होणार्‍या परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा या संघटनेने एक निवेदन जारी करीत दिला आहे. मिझोराममधील माजी दहशतवाद्यांच्या संघटनेने तेथील मैतेईंना तत्काळ राज्य सोडण्याची धमकी दिल्यानंतर त्याचे पडसाद आता लगतच्या राज्यांत उमटू लागले आहेत. ऑल आसाम मणिपूर स्टुडंटस् युनियनने म्हटले आहे की, मणिपुरात कुकी दहशतवादी थैमान घालत असताना मैतेईंना धमक्या देणे चुकीचे आहे. त्यामुळेच आम्ही आसामातील कुकींना परत जाण्याचा इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर फेक न्यूज; गुन्हा दाखल

महिलांच्या विवस्त्र धिंडीचे फोटो शेअर करून या घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पदाधिकारी व त्याच्या मुलाचा हात असल्याचा संदेश शेअर करणार्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मणिपूर पोलिसांनी सांगितले की, आपली छायाचित्रे हेतूपुरस्सर त्या संदेशात घुसवल्याबाबत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याने तक्रार दिल्यानंतर सायबर गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेक न्यूजच्या माध्यमातून राज्यात आगीत तेल ओतण्यााचा प्रयत्न काही शक्ती करत असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मणिपूर पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news