कोल्हापूर : राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा ‘सत्याग्रह’

कोल्हापूर : राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा ‘सत्याग्रह’
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ रविवारी जिल्हा काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

राहुल गांधी यांची खासदारकी भाजप सरकारने राजकीय सुडातून रद्द केल्याचा आरोप करून आंदोलकांनी भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हुकूमशाही पद्धतीने देश चालविणार्‍या भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. 'लढेंगे जितेंगे', 'राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'भाजप सरकरचा धिक्कार असो, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पापाची तिकटी परिसर दणाणून सोडला. तिरंगी रंगात मंडपाची उभारणी केल्याने आंदोलनस्थळ काँग्रेसमय झाले होते. आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या 'डरो मत' फलकाने उपस्थितांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी दहापासून आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु होती.

राहुल गांधी यांचा एवढी शिक्षा देण्याइतका गुन्हा नाही. भांडवलदारांना देशातील कंपन्या विकून देश संपविण्याचे काम केले आहे. गांधी यांना सभागृहात बोलू दिले जात नाही. भाजपला सत्ता हातातून निघून जाईल असे दिसत आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वीच्या भाषणाच्या आधारावर राहुल गांधी यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशा शब्दात आ. पी. एन. पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला. भारत जोडो यात्रेतून निर्माण झालेली राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आ. पी. एन. पाटील, राजूबाबा आवळे, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, भगवान जाधव, हिंदुराव चौगले, शंकरराव पाटील, उदय पोवार, सुप्रिया साळोखे, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, भारती पोवार, निलोफर आजरेकर, ईश्वर परमार, गुलाबराव घोरपडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी सत्य मांडले

राहुल गांधी यांनी सत्याची भूमिका मांडण्याचे काम केले आहे. त्यांची देशभरात लोकप्रियता वाढत असल्याच्या भीतीने भाजपने त्यांच्यावर ही कारवाई केली. लोकशाहीचा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय की काय अशी भीती वाटत आहे. अशा प्रवृत्तींना आताच विरोध केला नाही तर मतदानाचा हक्कही राहाणार नाही, अशी परिस्थिती येईल, असे आ. ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news