

खटाव : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी शोधण्यासाठी खटाव तालुक्यातील महसूल यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी भूमीअभिलेख, पोलिस व शिक्षण विभागही कुणबी नोंदी शोधणार आहे. जन्म-मृत्यू नोंदी, शाळेचे दाखले, जुने दस्त, फेरफार, सीटीसर्व्हेच्या नोंदी तपासण्यात येणार आहेत. खटाव तहसील कार्यालयातील कक्षात कुणबी शोधमोहिमेची चांगलीच लगबग सुरू झाली आहे.
राज्यात मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पुरावे संकलन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तालुकास्तरावर प्रत्येक तहसील कार्यालयात असा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. खटाव तालुक्याच्या तहसील कार्यालयात उशिरा का होईना, कुणबी नोंद शोध मोहिमेने वेग घेतला आहे. बुधवारपर्यंत 13 गावांच्या नोंदी तपासण्यात आल्या होत्या, त्यातील दोन गावांमध्ये कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले आहेत. तालुक्यातील सर्व गावांमधील अभिलेख शोधून पूर्ण झाल्यावर कुणबी दाखले देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पुरातन काळापासून पुरोहितांकडे वंशावळ लिहिण्याची पद्धत होती. त्यांच्याकडे फार जुन्या नोंदी आहेत. खासकरून नाशिक येथील पुरोहितांकडे अशा नोंदी मोठ्या प्रमाणावर आहेत. तालुक्यातील खटाव येथील काही मराठ्यांच्या कुणबी म्हणून असलेल्या नोंदी नाशिकमध्ये आहेत असे समजत आहे. त्यामुळे कुणबी नोंदी शोधण्यासाठी नाशिकला जायचे नियोजन काहींनी केले आहे. इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीही पुरोहितांकडे याबाबत चौकशी करून माहिती घेतली जात आहे.
दस्तावेजात 1912 नंतरच्या कागदपत्रांवर मराठीत नोंदी करण्यात आल्या आहेत. मात्र 1890 ते 1912 दरम्यानची कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. असे दस्तावेज तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत मिळावी म्हणून खटाव तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क केला आहे. 1912 पूर्वी कुणबी नोंदी अधिक प्रमाणावर असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या नोंदी काळजीपूर्वक तपासाव्या लागणार आहेत.
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्याचे गांभिर्य ध्यानात घेता कुणबी नोंदी शक्य तितक्या लवकर शोधाव्या लागणार आहेत. या कामात महसूल यंत्रणेसह शिक्षण आणि भूमिअभिलेख विभाग आणि गरज लागेल तशी पोलिस विभागाची मदत घ्यायची आहे. खटाव तालुक्यात बुधवारी दुपारपर्यंत महसूल विभाग सोडून इतर विभाग या कामात सहभागी झाले नव्हते. प्रत्येक विभागाने आपापले अभिलेख तपासायचे आहेत. तसे झाले तरच अधिकाधिक नोंदी वेगाने तपासून होणार आहेत.