Sarvapitri Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्या आज रात्रीपासून सुरू; जाणून घ्या महत्त्व
पुढारी ऑनलाईन : सर्वपित्री अमावस्या शनिवारी (दि.१४) आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे. या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक शुभ योग तयार होत आहेत. दुसरा शनि अमावस्येचा संयोग आहे. यासोबतच शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे यमघंटक योगही आहे. १६ दिवस चालणारा श्राद्ध पक्ष सर्वपित्री अमावस्येला संपतो. जर एखाद्याने आपल्या पितरांच्या तिथीला श्राद्ध केले नसेल, तर तो या अमावस्येला करू शकतो. (Sarvapitri Amavasya 2023)
हिंदू धर्मामध्ये पितृपंधरवड्यामध्ये 'सर्वपित्री अमावस्या' (Sarvapitri Amavasya 2023) या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. कारण या पंधरा दिवसांच्या काळात यमलोकांतून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते, अशी समजूत आहे. त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो.
Sarvapitri Amavasya 2023 : महालय पक्ष पितृ कार्याला अत्यंत योग्य
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला महालय पक्ष किंवा पितृपक्ष असे म्हणतात. हा पक्ष पितृ कार्याला अत्यंत योग्य आहे. कारण या पक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी समजूत आहे.भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालयश्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.
हे श्राद्ध पितृत्रयी – पिता, पितामह, प्रपितामह; मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही, सापत्नमाता, मातामह, मातृपितममही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्यपुत्र, जावई, बहिणाचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उद्देश करतात. देवांच्या जागी धूरलोचन संज्ञक विश्वेदेवे घ्यावे. शक्य असल्यास देवांकरता दोन, तीन पार्वणांना तीन, पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येक एक असे ब्राह्मण बोलवावे. एवढे शक्य नसेल तर देवांकरत एक, तीन पार्वणांकरता तीन आणि एकोद्दिष्ट गणाला एक असे पाच ब्राह्मण सांगावे. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्मीकरण, पिंडदान, विकरदना, स्वधावाचन वगैरे विधी करायचे असतात.
सर्वपित्री अमावस्या ही सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करण्याची तिथी
योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे 'यावदवृश्चिक दर्शनम' म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत तो कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो. या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना त्या वर्षी मृत झालेल्या मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध करतात. भाद्रपद वद्य नवमीला अविघवा नवमी म्हणतात. या दिवशी सौभाग्याने मृत झालेल्या स्त्रीबद्दल श्राद्ध करण्याचा किंवा सवष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवम म्हणतात. सौराष्ट्रात वद्य त्रयोदशीला बाळभोळानी तेरस म्हणतात. या दिवशी कुळात मृत झालेल्या लहान मुलांची आठवण करून त्यांच्या प्रीत्यर्थ काकबळी देतात. सर्वपित्री अमावस्या ही सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करण्याची तिथी आहे. महालयासाठी भूरिभोजन घालावे आणि आप्तेष्टानांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे, असे शास्त्रवचन आहे.
गावागावात सर्वपित्री अमावस्या दिवशी आपल्या अंतर्मनात ज्यांना स्थान आहे अशा व्यक्तींना सपत्नीक घरी बोलावून त्यांचे पूजन करून आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ यथोचित खाऊ घालून यथाशक्ती मानपान दक्षिणा देऊन सर्वपित्री अमावस्ये दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला या दिवशी श्राद्ध करण्यासाठी शक्य नसल्यास निदान घरात केलेले जेवण केळीच्या पानावर वाढून एक पान गाईसाठी व एक कावळ्यासाठी ठेवले जाते.
सर्वपित्री अमावस्येला करण्यात येणारे श्राद्धकार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णानेही भगवद् गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावस्येला केलेले श्राद्धकार्य अत्यंत शुभ मानले जाते.
(संदर्भ – भारतीय संस्कृती कोश, खंड ७)
हेही वाचा

