

पुढारी ऑनलाईन: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला शनिवारपासून सुरुवात झाली. यावर्षीचा 338वा पालखी सोहळा आहे. देहूमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. साडे तीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूमध्ये राज्याच्या विविध भागातून वारकरी दाखल झालेले आहेत. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते पहाटे महापूजा करण्यात आली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
टाळ- मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. शनिवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी देखील इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं.
हेही वाचा: