मालवणातील बिळवसच्या समृद्धीची रशियाला भुरळ!

मालवणातील बिळवसच्या समृद्धीची रशियाला भुरळ!
Published on
Updated on

श्रावण, पुढारी वृत्तसेवा : लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम म्हणून समजले जाते. लावणीने आजपर्यंत फड, तमाशा, नाटक, मराठी सिनेमा, भारतीय संस्कृती यावर अधिराज्य गाजवले आहे. याच मराठमोळ्या लावणीने रशियामध्येसुद्धा तेथील लोकांना भुरळ घातली. निमित्त होते मालवण तालुक्यातील बिळवस गावातील समृद्धी पालव या मुलीने सादर केलेल्या लावणी नृत्याचे. रशियामधील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि तेथील ग्रामस्थांना समृद्धीने ताल धरायला लावत रशियन ग्रामस्थांची मने जिंकली.

भारत देशाप्रमाणे रशियामध्ये दिवाळी सेलिब्रेशन होत नसते. रशियामध्ये न्यू इयर फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रशियामध्ये इझेव्हस्क स्टेट मेडिकल अकादमी हे प्रसिद्ध असे वैद्यकीय कॉलेज आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये विविध देशातील विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. याच कॉलेजमध्ये मालवण तालुक्यातील बिळवस गावची समृद्धी पालव ही कन्या शिक्षण घेत आहे.

यावर्षी या मराठी कल्चर्सच्या मुलींनी दिवाळी फेस्टिवल साजरा करण्याची डीन यांच्याकडून परवानगी मिळविली. याचेच औचित्य साधून समृद्धी पालव हिने आपल्या सहकारी मुली-मुलांना घेऊन काही लावणी गीते कोरिओग्राफ करून ती या फेस्टिवलमध्ये सादर केली. सर्व विद्यार्थ्यांबरोबर लावणी नृत्य सादर करताना समृद्धी पालव हिने स्वतः सादर केलेल्या 'चंद्रा' या लावणी नृत्याने संपूर्ण सभागृह या लावणीच्या ठेक्यावर थिरकायला लावला.

या कॉलेजचे प्रत्यक्ष डीन यांनासुद्धा या लावणीची भुरळ पडली. त्यांनी सुद्धा काही क्षण या लावणीवर ठेका धरला. वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्ट्या यांचा तर यावेळी पाऊसच पडला. यातच आपल्या मराठमोळ्या लावणीने आणि समृद्धी पालवने रशियातील रसिकांची मने जिंकल्याचे समोर आले. जेव्हा रशिया सारख्या देशांमध्ये आपल्या मराठमोळ्या लावणीने तेथील रसिकांची आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या सर्व देशातील मुलांची मने जिंकली त्या समृद्धी पालवचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे. आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना आपली मराठी संस्कृती रशियामध्ये सुद्धा त्याच ताकदीने सादर केली, अन् रशियन नागरीकांना भारतीच संस्कृतीची भुरळ पाडली.

समृद्धी बिळवस गावची कन्या

समृद्धी पालव ही मालवण तालुक्यातील बिळवस गावची कन्या आहे. सध्या मुंबई-मुलुंड येथे वास्तव्यास असणार्‍या समृद्धी हिची आई मधुरा पालव आणि वडील मंगेश पालव यांचे समृद्धी हिला तेवढेच मोठे सहकार्य आहे. अगदी लहान वयापासून समृद्धीच्या आवडीनिवडी जपून तिच्या आई-वडिलांनी समृद्धी हिला डॉक्टर होण्यासाठी रशियामध्ये शिक्षणासाठी पाठविले आहे. तिने भारतीय आणि महाराष्ट्राची लावणी सातासमुद्रापार नेली, निश्चितच प्रत्येक भारतीयांचा आणि कोकणवासीयांचा उर भरून आलेला आहे. या दिवाळी फेस्टिवलमध्ये सादर केलेल्या अनेक लावणी नृत्यांना या कॉलेजच्या मुख्य डीन दिमित्री ओप्लोविन्स्की यांनी विशेष कौतुक करून भारतीय आणि महाराष्ट्राच्या या संस्कृतीचे सुद्धा विशेष कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news