स्वरबहार रामदास कामत

स्वरबहार रामदास कामत
Published on
Updated on

मराठी रंगभूमीवरील स्वरबहार रामदास कामत यांचे निधन रसिक श्रोत्यांना चटका लावून गेले. त्यांचे योगदान मराठी रंगभूमी कधीच विसरणार नाही. त्यांच्या कामाची रंगभूमीवरील पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.

रामदास कामत मूळचे गोव्याचे. 18 फेब्रुवारी 1931 ला म्हापसा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे चुलत मामा त्या काळचे गाजलेले संगीत अभिनेते श्रीपादराव नेवरेकर. त्यामुळे लहानपणापासून नाटक त्यांच्या रक्तात भिनलेे. गोव्यामध्ये प्रत्येक उत्सवात नाटक करण्याची पद्धत आहे. नाटक हा तेथील संस्कृतीचा भाग आहे. कामत उत्सवातील नाटकांमध्ये काम करायचे. त्यांनी शास्त्रीय संगीताचे पहिले धडे गिरवले ते बंधू उपेंद्र यांच्याकडे. पुढे ते मुंबईला आले. अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. त्यांना एअर इंडियात नोकरी मिळाली. एखाद्याचे गाणे, नाटकाचे वेड मागे पडले असते; पण कामत यांनी त्यांच्या या वेडाला अटकाव किंवा बंधन घातले नाही. त्यांची सुरुवात झाली ती गोवा हिंदू असोसिएशनच्या एका नाटकातून. त्यानिमित्ताने नाट्यगुरू गोपीनाथ सावकार हे त्यांना गुरू म्हणून लाभले. संशयकल्लोळ नाटकातील त्यांचे पद, शारदा नाटकातील मुख्य भूमिका गाजली.

कामत यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. भूमिकेचा पूर्ण अभ्यास झाल्याखेरीज ते रंगभूमीवर यायचे नाहीत आणि त्यांची प्रत्येक भूमिका त्यांनी समरसून केली. पुढे 1964 साली गोवा हिंदू असोसिएशनला व्यावसायिक रंगभूमीवर संगीत नाटक आणायचे होते. म्हणून वसंत कानेटकर यांच्याकडून मत्स्यगंधा नाटक लिहून घेतले. त्यांना संगीतकारही नवीन हवा होता. म्हणून त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांची निवड केली. कामत यांचे हे पहिलेच व्यावसायिक संगीत नाटक. दोघेही गोवेकर असल्याचा समान धागा आणि एकमेकांमधील आत्मीयता यातून पुढे मोठे विश्व निर्माण झाले. कामत यांच्या आवाजातील मत्स्यगंधा नाटकातील रेकॉर्ड बाजारात आल्या.

नाटकाचे सातशे प्रयोग हाऊसफुल्ल झाले. कामत यांचे ते पहिले व्यावसायिक यश. त्यानंतर त्यांची सर्वच नाटके यशस्वी ठरली. ज्यामध्ये 'मीरा मधुरा', 'ययाती देवयानी', 'हे बंध रेशमाचे' यांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात पारंपरिक संगीत नाटकातील प्रमुख भूमिका ते करत राहिले. मात्र, जुन्या कुणाचे अनुकरण न करता आपली स्वतंत्र शैली निर्माण केली. 'एकच प्याला'तील रामलाल, 'मृच्छकटिक'मधला चारुदत्त, 'सौभद्र'मधला कृष्ण, 'मानापमान'मधला धैर्यधर अशा अनेक भूमिका केल्या. कामत यांनी कधी गद्य आणि पद्य यातील स्वरांत भेद केला नाही. रसनिर्मिती हे नाटकाचे फलित आहे, हे त्यांनी कायम डोक्यात ठेवले. त्यांच्याकडे चपळ आणि तेज अशी तान होती, आलापी होती. याचा योग्य ठिकाणी त्यांनी वापर केला. त्यांच्या रंगमंचावरील एन्ट्रीलाच ते टाळ्या घेत. गायक म्हणून ते श्रेष्ठ होतेच; पण ते अभिनेते म्हणूनही श्रेष्ठ होते. संगीत रंगभूमी त्यांच्यासारख्या लोकांमुळेच गाजली.

1960 सालानंतर पुन्हा एकदा संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था यायला लागली. त्या काळातील कामत यांचे योगदान मोठे आहे. त्यांची कारकीर्द बहरत गेली. 'प्रथम तुज पाहता', 'देवा तुझा मी सोनार', 'पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव', 'विनायका…' ही गाणी आजही रसिकांना मोहिनी घालतात. 1997 साली त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घ्यायची असे ठरविले. 'संगीत मानापमान'च्या प्रयोगातील शेवटचे गाणे झाले. त्यावेळी पुढे आम्ही एक स्टूल आणून ठेवले आणि त्या निवृत्तीचे प्रतीक म्हणून धैर्यधराची चांदीची पगडी त्यांनी काढून ठेवली. त्यावेळी प्रयोग हाऊसफुल्ल होता. प्रेक्षक रडत होते. प्रेक्षकांमधून चालत जाताना रसिकांनी कामतांवर फुलांचा वर्षाव केला. ते मेकअप रूममध्ये गेले. खूप रडले; पण कामत यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीचा योग्य असा निवृत्तीचा सोहळा पुण्यात घडला याचा आम्हाला अभिमान आहे. नव्या पिढीतील कलाकारांनी संगीत नाटकाची परंपरा जतन करणे हीच कामत यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news