सदैव वंदनीय गुरुवर्य!

सदैव वंदनीय गुरुवर्य!

आज (सोमवार) गुरुपौर्णिमा. त्यानिमित्त…

पारमार्थिक जीवन असो किंवा व्यावहारिक, सर्वत्र विश्वासू मार्गदर्शकाची, उपदेशकाची म्हणजेच पर्यायाने गुरूची गरज ही असतेच. भारतीय संस्कृतीमध्ये तर सद्गुरूंचे स्थान प्रत्यक्ष परमेश्वरापेक्षाही अधिक सांगितलेले आहे. गुरुतत्त्व हे एकच असते. त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व धर्म, पंथ, संप्रदायांतील, देश-विदेशातील सर्व गुरूंचे स्मरण, वंदन होत आहे.

वेद-उपनिषदांपासूनच आपल्याकडे सद्गुरूंचे माहात्म्य सांगितले गेले आहे. प्राचीन छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे, 'आचार्यवान पुरुषो वेद.' त्याचा अर्थ जो साधक आचार्यांच्या, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना, ज्ञानार्जन करीत आहे, त्यालाच ज्ञान मिळते. तैत्तिरीय उपनिषदातही म्हटले आहे, 'आचार्य देवो भव.' 'आचार्य' म्हणजे कोण, हे आद्य शंकराचार्यांनी आपल्या गीतेवरील भाष्यात स्पष्ट केलेले आहे. जी व्यक्ती ज्ञान संपादन करून कृतार्थ झालेली असते तिच आचार्य असते, असे त्यांनी म्हटले आहे. शिष्य हा अकृतार्थ असतो व त्यामुळेच अशी कृतार्थता संपादन करण्यासाठी तो परमेश्वराची व सद्गुरूंची प्रार्थना करीत असतो. आचार्यांच्या कृपेने, ज्ञानदानाने तो कृतार्थ होतो. प्राचीन काळी शिष्य हातात समिधा घेऊन तत्त्वदर्शी गुरूकडे ज्ञानार्जनासाठी जात असत. मुंडक उपनिषदामध्ये म्हटले आहे की, 'तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियं ब—ह्मनिष्ठम.' त्याचा अर्थ 'शाश्वत आत्मतत्त्वाचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, हातात समिधा घेऊन श्रोत्रिय व ब—ह्मनिष्ठ गुरूकडे जावे.' असा सद्गुरू हा 'श्रोत्रिय' म्हणजेच शब्दज्ञानात पारंगत असावा आणि तो 'ब—ह्मनिष्ठ'ही असावा म्हणजे त्याला परमात्मतत्त्वाचा अपरोक्षानुभव येऊन त्यामध्ये तो स्वतः सर्वकाळ स्थित असावा, असे दोन महत्त्वाचे निकष यामध्ये सांगितलेले आहेत. असा गुरू आपल्याकडे आलेल्या शांत चित्त आणि जितेंद्रिय शिष्याला ब—ह्मविद्या देत असे. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण गुरूकडे जाऊन ज्ञान घेण्यास सांगतात. 'तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः॥' म्हणजे 'हे ज्ञान तू तत्त्वदर्शी ज्ञानी गुरूकडे जाणून प्राप्त कर. त्यांना नम—तेने दंडवत प्रणाम केल्यावर, त्यांची सेवा केल्यावर आणि कपटरहीत, सरळपणाने प्रश्न विचारल्यावर असे तत्त्वदर्शी, ज्ञानी महात्मा त्यांना जे परमात्मतत्त्व माहिती आहे त्याचा तुला उपदेश करतील.' प्राचीन काळी अशा 'तत्त्वदर्शी' आणि 'शाब्दे परे च निष्णात' गुरूकडे जाऊन ब—ह्मविद्या मिळवली जात असे.

भगवान दत्तात्रेयांना आपल्याकडे 'आदिगुरू' या स्वरूपात पाहिले जात असते. या दैवताचा उल्लेखच 'श्री गुरुदेव दत्त' असा होत असतो. दत्तगुरूंच्या शिष्यांमध्ये विविध देवदेवता, ऋषीमुनी, राजांपासून ते दूरश्रवा भिल्लापर्यंत अनेकांचा समावेश आहे. स्वतः दत्तगुरूंनी चोवीस गुरू केल्याचे वर्णन भागवत पुराणासारख्या ग्रंथांमधून आढळते. जिथे चांगला गुण दिसेल तेथून तो आत्मसात करावा हा त्याचा मतितार्थ. दत्तगुरूंना सर्व गुरुस्वरूपही मानले जाते.

त्यामुळे विशेषतः दत्त मंदिरांमध्ये तसेच दत्तावतारी सत्पुरुषांच्या क्षेत्री गुरुपौर्णिमेचा उत्सव विशेष उत्साहात साजरा होत असतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे आषाढ पौर्णिमेला भारतीय संस्कृतीमधील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या महर्षी व्यासांचा जन्म झाला. व्यासांनी वेदांचे चार भाग केले. अठरा पुराणे व महाभारतासारखा अजोड ग्रंथ लिहिला.

उपनिषदांमधील वाक्यांमध्ये विरोधाभास नसून समन्वयच आहे, असे सांगून त्यामधील साधना व फल यांचे स्पष्टीकरण करणार्‍या 'ब—ह्मसूत्रां'ची रचनाही त्यांनी केली. भारतीय दर्शनाची यथायोग्य मांडणी करणार्‍या व्यासांनाही गुरुस्थानी मानले जात असते. त्यामुळेच गुरूंच्या पूजेला 'व्यासपूजा'ही म्हटले जाते. 'गुरुगीते'त म्हटले आहे की 'गु' म्हणजे अंधार आणि 'रू' म्हणजे प्रकाश. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा तो 'गुरू' होय. हा गुरू ब—ह्मानंदस्वरूप, ज्ञानस्वरूप व दिव्य सुख प्रदान करणारा आहे. गुरुतत्त्व हे सर्वव्यापक, सर्व प्रकारच्या त्रिपुटीपासून वेगळे आणि नित्य असे आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अशा सद्गुरूंना विनम— प्रणाम!

– सचिन बनछोडे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news