विदेशी गंगाजळीची घागर हलकी!

विदेशी गंगाजळीची घागर हलकी!
Published on
Updated on

परकीय चलनाचा साठा जितका जास्त तितका रुपया मजबूत होतो. मोठ्या प्रमाणात विदेशी चलन असेल, तर कोणतीही वस्तू आयात करताना समस्या उद्भवत नाहीत. रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते.

अमेरिकेच्या कठोर निर्बंधांची फिकीर न बाळगता, भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केले. भारताच्या या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कौतुक केले आहे. भारताची खनिज तेलाची गरज मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपली खनिज तेलाची मागणी दररोज 45 लाख बॅरल्स इतकी असून, लवकरच ती 51 लाख बॅरल्सवर जाईल, अशी शक्यता आहे. भारत गरजेच्या 85 टक्के तेलाची आयात करतो. त्यामुळे तेलाचे भाव वाढल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला मोठाच फटका बसणार आहे, हे नक्की. आयातीवरील खर्च जेवढा वाढतो, तेवढा विदेशी गंगाजळीवरील ताणही वाढतो.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडे 629 अब्ज डॉलर्स इतका परकीय चलन साठा शिल्लक होता. मागील वर्षी 3 सप्टेंबरला हा साठा 642 अब्ज डॉलर इतका होता. हा साठा कमी होण्याचे कारण काय? एक तर, या गंगाजळीचा महत्त्वपूर्ण भाग मानल्या जाणार्‍या एफसीए किंवा परकीय चलन मालमत्तेत घसरण झाल्याचा हा परिणाम आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणे निधीमधील भारताचा साठाही 42 दशलक्ष डॉलरने घसरून, तो आता सुमारे पाच अब्ज डॉलर इतका आहे. देशाच्या विकासात परकीय चलनाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. देशात परकीय चलन किती आहे, यावरूनच रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण ठरत असते. आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात परकीय चलनाचा साठा असेल, तेवढ्या अधिक प्रमाणात रुपया इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होतो. परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यास, रुपयाच्या मूल्यातदेखील घट होते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विदेशी चलन असेल, तर विदेशांतून कोणतीही वस्तू आयात करताना समस्या उद्भवत नाहीत.

विदेशी गंगाजळीची घागर भरलेली असेल, तर रुपया मजबूत होऊन महागाईही नियंत्रणात राहते. एखाद्या देशाच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने वाढ होत असेल, तर ते त्या देशाच्या द़ृष्टीने सकारात्मक संकेत असतात. विदेशी चलन साठा वाढत आहे, याचा दुसरा अर्थ असा की, परकीय गुंतवणूकदार देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. तसेच देशात गुंतवणूक वाढली की, नवनवे कारखाने/प्रकल्प स्थापन होतात आणि त्यामुळे रोजगाराचीही निर्मिती होते.

आता तर अगदी ताज्या, म्हणजे 11 मार्च 2022च्या आकडेवारीनुसार, भारताचा विदेशी चलन साठा सुमारे नऊ अब्ज डॉलर्सने घटून तो 622 अब्ज डॉलर्सवर आला आहे. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वाधिक घसरण आहे. यापूर्वी कोरोना महामारीच्या काळात 20 मार्च 2020 ला संपलेल्या सप्ताहाअखेर हा साठा 12 अब्ज डॉलर्सने कमी झाला होता. तेव्हादेखील आणि आजही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर (एफपीआय) आपल्याकडील समभाग विकत असल्याचा तो परिणाम होता आणि आहे. शिवाय कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया 77 वर गेला. आणखी घसरण होऊ नये, म्हणून रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील डॉलर्स विकण्यास सुरुवात केली. 8 मार्च 2022 ला रिझर्व्ह बँकेने 5.135 अब्ज डॉलर्स बँकांना विकले. जेव्हा मध्यवर्ती बँक डॉलर्स विकते, तेव्हा तितक्याच प्रमाणात अर्थव्यवस्थेतील रुपया काढून घेतला जातो. म्हणजेच रुपयाची तरलता कमी होते. या धोरणामुळे 17 मार्चला रुपयाचे मूल्य 41 पैशांनी वाढले.

मात्र, रुपयावर दबाव येण्याचे कारण काय होते? याचे कारण, परकीय गुंतवणूकदारांनी 41,617 कोटी रुपये मार्चमध्ये काढून घेतले. त्यात अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवणार, या बातमीमुळे एफपीआयनी भारतातील निधी काढून घेऊन तो अमेरिकेकडे वळवला. शिवाय कच्चे तेल 140 डॉलर्सवर जाऊन पोहोचल्यामुळे आपल्या साठ्यातील डॉलर्स मोठ्या प्रमाणावर या तेलाच्या आयातीसाठी खर्ची पडू लागले. आपत्तीच्या प्रसंगी विदेशी चलन साठाच कामास येतो, हे ध्यानात घेऊन, त्याच्या संचयाकडे लक्ष पुरवले पाहिजे.

– अर्थशास्त्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news