लवंगी मिरची : स्वर्गीय सुख

लवंगी मिरची : स्वर्गीय सुख
Published on
Updated on

मित्रा, ही नवीन आलेली बातमी वाचलीस का? जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्यांच्या आहारात आहे म्हणे. ते अत्यंत कमी कॅलरीज असलेले जेवण घेतात, मासे जास्त खातात आणि इतर मांसाहार फक्त सणावाराला करतात. मला सांग, आपण मराठी माणसे आणि जपानी माणसे यांचे आयुष्यमान किती आहे?
आपले मराठी माणसांचे सगळे काही अजब असते. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आयुष्यभर अट्टाहास करतात. आता आयुष्यमानाबद्दल म्हणशील, तर सर्वसाधारण विकसित देशांमध्ये जसे की जपान, ऑस्ट्रेलिया,अमेरिका येथील लोक 80 वर्षांपेक्षा जास्त जगतात. मराठी माणसांचे नेमके माहीत नाही; पण आपल्या देशाचे सरासरी आयुष्यमान 70 वर्षे आहे. त्याअर्थी मराठी माणसांचे पण तेवढेच असणार आहे.
हो, पण ते जपानी लोकांचे ग्रीन टी पिणे, मोजका आहार आणि शिस्तबद्ध आयुष्य याची तुलना आपल्याबरोबर होऊ शकणार नाही.
छे, छे, तसा प्रयत्नसुद्धा करू नकोस. आपण मराठी माणसे म्हणजे जेवणावर आडवा हात मारणारी माणसे आहोत. आता आपल्याच भागात बघ ना, दर रविवारी आणि बुधवारी न चुकता मांसाहार करणारी मंडळी आहेत. प्रत्येक रविवारी तांबडा, पांढरा किंवा काळा रस्सा यथेच्छ ओरपून हे लोक सोमवारपासूनच पुढे येणार्‍या रविवारची वाट बघत असतात. कशाचं आलंय आयुष्यमान? मिळाले आहे ते आयुष्य भाकरी चिकन किंवा मटण शेरव्यामध्ये कुस्करून खाऊन वर ढसाढसा पाणी पिल्यानंतर जे सुख मिळते ना ते जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव देणारे असते. अशा वेळेला कोण किती काळ जगणार याचा विचार करेल, तर तो मराठी माणूस असणार नाही. होय तर, मी आजूबाजूला नेहमी पाहतो. रविवारी सकाळी अत्यंत उत्साहाने लोक हातात पिशव्या घेऊन आपल्या आवडत्या कामगिरीवर म्हणजे खाटखुट आणायला निघालेले असतात. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत असतो. हेच लोक उन्हाळ्यामध्ये आंब्यावर तुटून पडतात. अगदी तीस-चाळीस वाट्या रस पिणारे बहाद्दर अजूनही सर्वत्र आहेत. घरातील महिला बिचार्‍या कुरड्या, पापड्या, खारवड्या यांचे वाळवण घालण्यासाठी अपार कष्ट करतात. पुढे उन्हाळ्यात कुटुंबातील सर्व सदस्य हे वाळवण तळून दिवसभर हादडत असतात. कोणाला आलीय इथं आयुष्यमानाची काळजी? म्हणजे जास्तीचे जगले तरी हे कुटुंबात्सल लोक खाण्याशिवाय दुसरे काही करणार नाहीत. परदेशात असे नसते. ते लोक मोजून मापून आहार घेत असतात. किती कॅलरीज पोटामध्ये जात आहेत, त्यात प्रोटिन किती, फॅट किती याविषयी ते सजग आणि सावध असतात. खाण्यावर आणि खिलवण्यावर प्रेम असणारा मराठी माणूस जे काय आयुष्य जगतो, ते मात्र अत्यंत रसिकतेने जगतो. दीर्घकाळ काय कोणीही जगेल; पण आहे ते आयुष्य रसरशीतपणे आणि जिभेचे चोचले पुरवीत जगणारा मराठी माणूस जगात श्रेष्ठ म्हणावा लागेल. आयुष्याचे काय ते कधीही संपून जाईल. मात्र, जीवनाचा आनंद लुटण्यात खरा आनंद आहे, हे मराठी माणसाला पक्के माहीत आहे. त्यामुळे राज्यात विविध प्रकारचे खवय्ये सापडतात. त्यातही मांसाहार करणार्‍यांची गोष्टच न्यारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news