लवंगी मिरची : संसाराची वाटणी

संसाराची वाटणी
संसाराची वाटणी

विशेष काही नाही बाबा! आई म्हणते, आधी तुमच्या प्रॉपर्टीमधली अर्धी मालमत्ता तिच्या नावावर करा. तरच ती स्वयंपाक करेल. हे तुमचे घर, तुमचे बँकेचे अकाऊंट आणि गावाकडे असलेल्या शेतीमध्ये बरोबर अर्धा वाटा देणार असाल, तर तरच ती काम करणार आहे. नाही तर घरातील एकाही कामाला ती हात लावणार नाही.

अरे वेड्या, सांगतोस काय? माझ्या नावावर असले तरी सगळे तिचेच आहे ना? पुन्हा वेगळे तिचे नाव लावायची काय गरज आहे?
तसं नाही; पण बाबा नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की, पतीच्या मालमत्तेमध्ये पत्नीचा अर्धा वाटा असणार आहे. शिवाय सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, पत्नी घरकाम करते, मुलांना डबे देते, त्यांना आंघोळी घालते, शाळेत पाठवते, घेऊन येते ही सर्व अत्यंत महत्त्वाची कामे असून त्यामुळे पतीच्या मालमत्तेमध्ये तिला बरोबरीने वाटा मिळाला पाहिजे. सकाळी पेपर वाचल्याबरोबर आधी आईने ही बातमी वाचली. खरंच सांगतो बाबा, ती घर झाडत होती, ही बातमी वाचताच तिने झाडू फेकून दिला आणि स्वयंपाक घरात जाऊन बसली आहे.

आधी काय ते स्पष्ट करा आणि नुसते सांगू नका तर प्रत्यक्ष वाटण्या करून द्या, तरच मी घरकाम करेन, असा निरोप तुम्हाला देण्यासाठी तिने माझ्याजवळ सांगितला आहे. अरे, काय वेडबिड लागले की काय तुझ्या आईला ? तिला जाऊन सांग, संसार दोघांचा असतो. आजवर जे काय केले ते दोघांनी मिळून केले. मग आता वाटणी मागायची काय गरज आहे? आणि हो, तिला विचार, तिला जे दागिने मी केलेत त्याची पण आमच्या दोघांत वाटणी करायची. की काय? बंड्या तिला हे पण विचार की, तू आणि तुझी बारकी ताई यांची पण वाटणी करायची की काय? उद्या पेपरमध्ये काहीही छापून येईल त्याप्रमाणे वागायला गेलो, तर संसाराचे तीनतेरा वाजतील, हे लक्षात ठेव म्हण!

ते मला काही माहीत नाही बाबा! तुमचे आणि तुमच्या बायकोचे जे काय वाद असतील ते परस्पर थेट बोलून मिटवा. उगाच मला मध्ये ओढू नका. मला अभ्यास करायचा आहे, तरी पण ती इतक घरामध्ये राबते, हे मला दिसत आहे बाबा! तुम्ही तिच्या कामाचा रिस्पेक्ट ठेवत नाहीत, हा माझा पण आरोप आहे तुमच्यावर. त्यामुळे तुम्ही मालमत्तेची वाटणी आधी करून द्यावी, हे उत्तम आणि काहीही भलते सलते बोलू नका. मालमत्तेची वाटणी सांगितलेली आहे कोर्टाने, मुलाबाळांची सांगितलेली नाही. देवाच्या दयेने आम्हा दोघा भावंडांना आई आणि वडील दोघेही आहेत आणि आम्हाला दोघे पाहिजे आहेत. त्यामुळे आमच्या वाटणीचा विचार न करता तत्काळ प्रॉपर्टीची वाटणी करा आणि हे भांडण थांबवा, तरच दुपारी गिळायला मिळेल, असा आईचा निरोप आहे.

अशी कशी बुद्धी फिरली रे तुझ्या आईची ? गुण्यागोविंदाने संसार करावा, मुले मोठी करावीत, ते दिले सोडून आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत बसली आहे. जा आणि तिला सांग, प्रॉपर्टीमध्ये वाटणी देणार नाही. त्यापेक्षा सगळी प्रॉपर्टीच तिच्या नावावर करतो. तूच हो म्हणाव मालकीण सगळ्या घराची. माझ्या नावाने मला काही नको. अरे गाढवा, तिला सांग, मी जे काही करतोय ते आपल्या सगळ्यांसाठी करतोय, एकट्यासाठी सांगायची गरज नाही बाबा! आई दाराआडून ऐकत होती. ती बघा कुकरची पहिली शिट्टी झाली आहे. दुपारी जेवण झालं की, प्रॉपर्टीची कागदपत्रे तिच्याकडे देऊन टाका आणि म्हणा तुझं नाव लावून घे! चला बाबा जेवायला, कुकरची दुसरी शिट्टी झाली.- झटका

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news