स्थळ: मुख्यमंत्र्यांची केबिन. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत.
मुख्यमंत्री: ओ हो होऽऽ देवा भाऊ, काय ते तुमचे साहेब? वाहवा! अहो रुपम, अहो ध्वनी. काय ते त्यांचे चालणे आणि काय ते त्यांचे बोलणे. काय ते जनतेला वंदन करणे आणि काय ते आपल्या दादांच्या पाठीवर थोपटणे. काय ते आधारवडासोबत हस्तांदोलन करणे, सर्व काही चकीत करणारे होते. परवा साहेबांची भेट घ्यायला सहकुटुंब दिल्लीला गेलो होतो तेव्हाचे रूप वेगळे, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरातील रूप वेगळे, टिळक पुरस्कार स्वीकारतानाचे रूप वेगळे आणि मेट्रोचे उद्घाटन करतानाचे रूप आणखीच वेगळे आणि त्याचबरोबर घरकुलांचे वाटप करतानाचे आणखी वेगळे. बेहद खूश झाला आहोत आपण तुमच्या साहेबांवर! तुमचे साहेब म्हणजे एक नंबर आहेत.
अहो, एकनाथराव ते आता फक्त आमचे साहेब राहिलेले नाहीत. ते सर्वांचे साहेब आहेत, तसेच तुमचेही साहेब आहेत आणि दादांचे पण साहेब आहेत. जगातील सगळ्यात टॉपच्या लोकप्रिय पंतप्रधानांमध्ये आमचे साहेब, म्हणजे तुमचे आणि आमचे साहेब जगात एक नंबर आहेत. काय, बरोबर आहे की नाही दादा?
होय हो. मी तर साहेबांचे चालणे, वागणे, बोलणे, ऐकणे सर्व पाहून गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्या प्रेमात आहे. देवाभाऊ, आपण दोघांनी मिळून एकदा पहाटे पहाटे प्रयत्न केला होता; पण भावकीमुळे विनाकारण माझी अडीच वर्षे फरफट झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिश्मा पाहून मी ठरवले की, आता या साहेबांचे सोबतच राहायचे. तसे आमचे आधारवड साहेब पण मोठे आहेत; पण या साहेबांची तुलना होऊ शकत नाही. शिवाय तळ्यातमळ्यात, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, यामुळे आमची कुणालाच खात्री वाटत नाहीये. पहाटेच्या शपथविधीच्या फसलेल्या प्रयोगानंतर, तर सगळीकडे फक्त संशयाचे धुके निर्माण झाले होते. शिवाय दिल्लीवाल्या साहेबांच्या आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील लोक प्रेमात आहोत.
हे पाहा दादा, मी पश्चिम महाराष्ट्राचा, मी विदर्भाचा हे आता बंद केले पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमची, सीएम साहेबाची आणि माझी हाय कमांड एकच आहे. शिवाय आमच्या साहेबाचा संपूर्ण देशावर नाही, तर जगातल्या 180 देशांपैकी कमीत कमी सव्वाशे देशांवर कंट्रोल आहे. आमच्या साहेबांनी कोणत्याही देशात पाय टाकला की, 'मोदी मोदी'चे नारे लागतात. आता परवा फ्रान्सला गेले होते, तिथे तेच, अमेरिकेला गेले तिथे तेच. अफ्रिकेतल्या कोणत्याही देशात गेले, तरी आमच्या साहेबांना ओळखत नाही असं शेंबडे पोरसुद्धा सापडणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा काय घेऊन बसला आहात? आसेतू हिमाचल साहेबांची सत्ता आहे. आता एकदा आमची पार्टी आंतरराष्ट्रीय पार्टी झाली की, आपण वेगवेगळ्या देशांमध्ये पण निवडणुका लढवणार आहोत. कधीकाळी बि—टिशांच्या साम—ाज्यावर सूर्य मावळायचा नाही, तशी आमच्या पक्षाची आणि आमच्या सोबत तुम्ही असल्यामुळे तुमची सर्वांचीही सत्ता जगभर येणार आहे, आहात कुठे?
मला काय वाटते देवा भाऊ, हे बघा, आता वर्षभरापासून मी मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्रिपदी तुम्ही सुद्धा पाच वर्षे होता. आपल्या दादांचे काय झाले की, दीर्घकाळ उपमुख्यमंत्री राहण्याचा जागतिक विक्रम त्यांच्याच नावावर आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या आजुबाजूला म्हणजे राजस्थान, सिक्कीम अशा राज्यांमध्ये निवडणुका लागल्या, तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुम्ही दादांना पुढे करा. भरघोस बहुमत येते की नाही ते पाहा. काय ती दादांची काम करण्याची शैली, झटपट निर्णय, लाल फितीवर वचक, कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध आणि विकासाची तळमळ असणारा नेता त्या राज्यांना तरी कुठे मिळणार आहे?
– झटका