

तो पेंग्विन बघा कसं फाईव्ह स्टार आयुष्य जगतोयते! नाहीतर आम्ही…
चिमणी ः चिव ऽऽऽ चिव ऽऽऽ चिव ऽऽऽ
चिमणा ः तुझा रोज चिवचिवाट चालूच असतो. निदान बाहेरून घरट्यात आल्यानंतर तरी हसून स्वागत करावं!
चिमणी ः चिव ऽऽऽ चिव ऽऽऽ चिव ऽऽऽ
चिमणा ः मॅडम, आज रागावलेल्या दिसताहेत.
चिमणी ः रागावू नको तर काय करू? मला तर या जगण्याचाच कंटाळा आलाय. आपली गरिबी संपायलाच तयार नाही. आपल्या विषयीची त्या बालकथा ऐकूनसुद्धा कंटाळा आलाय आता. काय तर म्हणे, 'काऊचं घर शेणाचं. चिऊचं घर मेणाचं. काऊ म्हणतो 'चिऊताई, चिऊताई दार उघड' तर, चिऊताई म्हणते, 'थांब माझ्या बाळाला तीटं लावू दे!' घरातली असली कामं करायची आणि राहायचं या घरट्यात!
चिमणा ः या गोष्टीचं तुला पूर्वी खूप कौतुक वाटत होतं. अशात का राग येतोय, तेच मला समजत नाही.
चिमणी ः (रागाने) चिव ऽऽऽ चिव ऽऽऽ चिव ऽऽऽ
चिमणा ः रागावू नकोस. बोलल्याशिवाय मला कसं समजेल?
चिमणी ः तो पेंग्विन बघा!
चिमणा ः काय त्याचं?
चिमणी ः त्याच्या देखभालीसाठी मुंबई महानगर पालिकेनं पंधरा कोटींची निविदा काढली होती म्हणे?
चिमणा ः अग, पण ती रद्द झाली. नकोस इतकं मनाला लावून घेऊ.
चिमणी ः रद्द झाली म्हणून काय झालं? पेंग्विनसाठी कोटीमध्ये खर्च केला जातो, हे तर समोर आले ना! किती भाग्यवान हा पेंग्विन. मी तर माझ्या मुलीला सांगणार आहे. इंटरकास्ट मॅरेज केलंस, तर त्या पेंग्विनशीच कर बाई! म्हणजे आमच्यासारखी साध्या घरट्यात राहण्याची वेळ येणार नाही तुझ्यावर! तो बघा कसा राहतोय राणीच्या बागेत राजासारखा! आपलं घरटं म्हणजे झोपडंच हो! मला या दरिद्रीपणाचाच कंटाळा आलाय. जन्माला जावं तर पेंग्विनच्या आणि देखभाल करणारा मिळावा तो आदित्यदादांसारखा! आमचं एवढं पुण्यच नाही. त्यामुळे आलो आम्ही चिमणीच्या जन्माला. लहान बाळांचे उष्टे घास खाण्यात आयुष्य गेलं! तो पेंग्विन बघा कसं फाईव्ह स्टार आयुष्य जगतोय ते!
चिमणा ः नकोस गं इतकी निराश होऊ. नशीब असतं ज्याचं-त्याचं चांगली माणसं मिळायला.
चिमणी ः आपली चिमण्यांची संघटना कमी पडते आपलं मार्केटिंग करण्यात आणि या महाराष्ट्रात आपल्या माणसांना मान कुठंय? मग, आपल्या सारख्या पक्षांना कुठून मिळणार? राजकारण स्थानिक प्रश्नांवर करायचं आणि प्रेम मात्र परदेशी पेंग्विनवर करायचं, हाच आहे का महाराष्ट्राचा अभिमान?
चिमणा ः तुझा सात्विक संताप होतोय. शांत हो! अगोदरच तुला बीपीचा त्रास आहे. आपण राज साहेबांकडे तुझं म्हणणं मांडू.
चिमणी ः नुसतं म्हणणं मांडू नका. जशी पेंग्विन गँग आहे ना, तशीच आपलीही गँग तयार करा. म्हणजे जरा वजन पडेल. नुसते पक्षी
पाठीशी असून चालत नाही. पक्षही पाठीशी असावा लागतो.
चिमणा ः (चमकून) फारच मुद्द्याचं बोललीस!