लवंगी मिरची : नावं बदलण्याचं कर्तव्य

लवंगी मिरची : नावं बदलण्याचं कर्तव्य

'हॅलो, हा कामत साहेबांचा फोन आहे का?'
'हो.'
'अहो, तुमचा पत्ता 'सुप्रीम रोड' असा आहे ना?'
'होता.'
'म्हणजे घर बदललं का तुम्ही?'
'नायबा रस्त्याचं नाव बदललं.'
'आता तो सुप्रीम रोड नाही का?'
'नाही. नुसता सुपंथ.'
'म्हणजे रोडचं नाव रोडावलंत म्हणा की. कधीपासून?'
'आठवत नाही; पण बदललंय खरं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमचं नाव देऊ देत का?'
'मी साधा कुरियरवाला, माझं नाव माहीत तरी असतं का? बरं, तुमची सोसायटी तरी 'आयडियल' ना?'
'होती.'
'म्हणजे? पूर्वी आदर्श होती, नंतर बिघडली? की तिथलं घर बदलून तुम्ही दुसरीकडे राहायला गेलात?'
'नायबा. आयडियल हे इंग्रजधार्जिणं नाव सोसायटीला नसावं असं म्हणतेय सध्याची मॅनेजिंग कमिटी.'
'त्यांना म्हणूदे काहीही. तिचं नावबीव प्रत्यक्ष बदललंय का एवढ्यात?'
'परवाच्या मीटिंगमध्ये ठरणार होतं. बाबाजीनगर की सर्वसुख सहनिवास यापैकी नक्की कोणतं ठेवायचं ते.'
'बापरे, हा बाबाजी कोण?'
'कोणीतरी संस्थापक, जातवाला असेल.'
'प्रत्येक नाव कोणाच्या तरी जातीत, धर्मात वगैरे निघणारच की! म्हणून दरखेपेला कमिटी बदलली की नावं बदलत बसायची का?'
'तुम्हाला का पडलीये ही नावांची उचापत?'
'पत्ते शोधूनशोधून पिट्टा पडतो हो आमच्यासारख्यांचा.'
'आता पोट भरायचं म्हटल्यावर कष्ट पडणारच ना?'
'नुसता कष्टाचा प्रश्न नाहीये साहेब! अहो, तुम्ही लोक नावं बदलता; पण पुष्कळांना ते माहीत नसतं. पुष्कळदा नावांच्या जुन्या पाट्या तशाच राहतात. लोक तर वर्षानुवर्षं जुन्या नावानेच ओळखतात… हे आणि वेगळंच.'
'आदतसे मजबूर असतात.'
'पण, अशी किती नावं बदलणार म्हणतो मी.'
'चालायचंच. त्याच त्या जगण्यात तेवढाच बदल.'
'पण, त्याने मिळतं काय?'
'मला काय विचारता? औरंगाबादचं संभाजीनगर झालं, अलाहाबादचं अचानक प्रयागराज झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं तेव्हा हे प्रश्न होतेच की!'
'मी तिथे कुरियरसेवा देणारा नाहीये साहेब, म्हणून तेव्हा प्रश्न नाही पडला मला. हैदराबादला भाग्यनगर म्हणा नाही तर वैराग्यनगर म्हणा, आमचं काही गेलं नाही; पण इथे डोळ्यादेखत कालचं नाव आज बदललं की गोंधळ उडतो.'
'पण, नाव बदलणार्‍यांना मोठ्ठं कर्तव्य पार पाडल्यासारखं होतं ना?'
'अहो, इथे गावागावांची पार दुरवस्था होत चाललीये. कुठे रस्ते धड नाहीत, कुठे पाणीटंचाई, कुठे ड्रेनेजचे वांधे, या बेसिक गोष्टी बदलाव्याशा नाही वाटत कोणाला?'
'त्या होतील हो हळूहळू! नसल्या तरी चालवून घेऊ. पण, नावं बदलली की, कशी लगेच डोळ्यात भरतात नाही?'
'आलोय वाटतं तुमच्या घराजवळ. एकच विचारतो.'
'अजून शंका आहेतच की तुम्हाला?'
'हो सर, तुमचं आडनाव तरी कामत म्हणून दिलंय. ते तेच आहे? का बदललंय? कोणाला तरी अचानक कर्तव्य वाटून?'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news