लवंगी मिरची : नव्या नावांचा सात-बारा

लवंगी मिरची
लवंगी मिरची
Published on
Updated on

आबुराव, काल रातच्याला तुमच्या गल्लीत कसला एवढा कालवा माजला होता हो?
कोपर्‍यावरच्या घरातल्या पोराने खालच्या जातीतली पोरगी केली म्हणे.
अरेच्चा. राजीखुशीनं, अक्कलहुशारीनं, नशापाणी न करता कोणाशी तरी गाठ बांधली तर इतरांनी एवढं रान माजवायचं कारण काय?
आय म्हणे, असली सून घरात घेणार नाही. बाप बोल्ला, वारसा आलेली इंचभर जमीन देणार नाही. आजा बसला अन्न सत्याग्रहाला.
है शाबाश. सगळ्यांनी मिळून सळो की पळो करून सोडलं म्हणा की नव्या जोडीला.
जातीपातीची लफडी शेवटी अशीच चिघळतात हो. पहिल्यापासून उगाच का म्हटलंय, जात नाही ती जात!
चुकलात. ही व्याख्या जुनी झाली. आता जाते ती जात, असं म्हणायचे दिवस आलेत.
स्वप्नं बघताय?
छे! ढळढळीत सत्य! आता सात-बारा उतार्‍यावरून जमिनीची जातिवाचक नावं कमी करा, वाड्यावस्त्यांची जातिवाचक नावं बदला, असं सांगतंय महसूल खातं.
म्हणजे कसं करायचं?
आता समजा, खूप गावांमध्ये महारवाडा असतो, एखादी कुंभारआळी, चांभारगल्ली वगैरे असते. बरोबर?
हो ना. जुनी वहिवाटीची नावं असतात ही.
पण 25 ऑगस्ट 2021 पासून राज्याच्या महसूल विभागाने जाहीर केलंय की, ही नावं यापुढे नकोत.
मग कोणती नावं ठेवायची?
तिथे डोंगर, नद्या, झाडोरा असं जे जे असेल त्यावरून नावं ठेवावी, असं म्हणणं आहे त्यांचं. समजा, महारवाड्यालगत खूप सारी बाभळीची झाडं आहेत, तर त्याला बाभळेश्वर म्हणू शकता. कोणाला चिंचवन, कोणाला अमृतडोह, कोणाला डाळिंबगाव, कोणाला शांताई अशी नावं ठेवावीत.
छ्या! ही कसली नावं? एवढ्या वर्षांची तोंडी बसलेली नावं एकदम कसे विसरतील लोक?
हळूहळू तर विसरतील. जातिवाचक नावांनी नुसता द्वेष, मत्सर वाढवला. त्याच्या बाहेर पडायलाच हवं.
तुम्ही करा चष्की! लोक नाही धूप घालणार.
राहाता, नेवासा तालुक्यांतील शेतकर्‍यांना अशा नव्या नावांचे सात-बाराचे उतारे मिळालेत सुद्धा. ग्रामपंचायतींनी पहिले तसे ठराव केले, ते जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केले. आहे काय अन् नाही काय? नगर जिल्ह्याला जे जमलं ते इतर जिल्ह्यांना, पूर्ण राज्याला का नाही जमणार?
बाबो, हे म्हणजे भलतंच क्रांतीबिंती करणं झालं की!
तो आव आणायचीही गरज नाही. काळाबरोबर इतकं काही गेलंय, जातंय, तशा जातीही जाव्यात हा मूळ मुद्दा आहे.
असं होईल सत्यात?
का नाही होणार? सारखे जातींचे उल्लेख करायचे, पोरपणापासून ते मनावर बिंबवायचे, त्यावरून कोणालातरी हिणवायचं, हे तर थांबवायलाच हवं ना?
पण आपलं कूळ, वंश, घराणं यांची शुद्धता नको टिकवायला?
चांगलं माणूसपण टिकवलं की जिंकलंच की. जाते ती जात, हे मानायला लागूया. मग सगळी अरिष्टं हळूहळू नजरेआड झालीच समजा!

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news