लवंगी मिरची : ध्वज‘वंदन’

लवंगी मिरची :  ध्वज‘वंदन’

हल्ली दिसत नाही तुम्ही नाक्यावर?

कारखान्यावर लागलोय कामाला.
अरे वा! कुठलं काम?
झेंडे बनवायच्या कारखान्यातलं. टेंपरवारी स्टाफ वाढवावा लागतो त्यांना.
झेंडे काय मुलांसाठी वगैरे का?
हो. मुख्यत्वे मुलांसाठी. अर्थात, इतरांनाही लागतीलच म्हणा झेंडे. आता 15 ऑगस्ट आला ना, झेंडे खपतात खूप सारे.
धंद्याचे दिवस आले म्हणा की.
हो. तसे ते दरवर्षीच येतात; पण यंदा तर प्रचंड मागणी येणार झेंड्यांना. आम्ही झेंडे बनवणारे पुरे पडू शकू की नाही? हा प्रश्न पडतोय.
हो ना! यंदा अमृत महोत्सव आहे झेंड्याचा. त्याचं स्मरण म्हणून 13 ते 15 ऑगस्ट देशातल्या प्रत्येक घरावर तिरंगा लावायची सूचना केलीये पंतप्रधानांनी.
छान कल्पना. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एखादा झेंडा फडकतानासुद्धा किती छान दिसतो. मग घराघरांवर झेंडे लहरले तर काय दृश्य दिसेल ते!
मूळ देखण्या झेंड्याच्या मध्यभागी चरख्याचं चित्र असायचं. तिथे अशोकचक्र घातलं निळ्या रंगात. घटना समितीने अर्थपूर्ण प्रतीक बनवण्याचं खास कामच घेतलं होतं. आता 75 वर्षांचा झाला की तिरंगा बघता बघता!
एरवी पंचाहत्तरीला माणूस थकतो. त्याचं रंगरूप, ताकद, जोम हे उतरत जातं; पण आपला झेंडा कसा रूबाबदार वाटतो नाही?
उगाच नाही ना म्हटलं? विजयी विश्व तिरंगा प्यारा?
हो. दिवाळीला कसा, घराघरांवर आकाशकंदील लटकतो, तसं होईल झेंड्यांचं.
नको. अगदी तसं नको व्हायला.
म्हणजे?
म्हणजे आपल्याकडे अनेक लोक दिवाळीचा कंदील शिमग्यापर्यंत तसाच लोंबकळत ठेवतात. त्याच्या झिरमिळ्या लोंबताहेत, कागद फाटलाय, रंग विटलाय. अशी दैना करतात. तसं तिरंग्याचं व्हायला नको म्हणजे मिळवली.
हा विचार नव्हता आला मनात.
आणायला हवा, तुम्ही एकट्याने नव्हे, सर्वांनीच मनात ठेवायला हवा.
तरी बरं, आता झेंड्याचे नियम खूप शिथिल केलेत म्हणतात.
हो. पूर्वी तुमच्यासारख्या कंपन्या झेंडा बनवूही शकल्या नसत्या परवानगीविना. आता तो कशाचा बनवायचा, कुठे आणि केवढा बनवायचा या अटी कमी केल्यात. ध्वज उजव्या हातातच घ्यावा, तो भिजवू, मळवू नये, पडदा म्हणून कधीही वापरू नये, जमिनीकडे झुकता नसावा अशा नानाअटी असत पूर्वी.
आता नाहीत ना? अमेरिकेत तर शर्ट, चड्ड्यांवर, भांड्याकुंड्यांवरसुद्धा ते देशाचा झेंडा चितारतात.
अमेरिकेतली प्रत्येक गोष्ट बरोबर नसते बर्का. आपण आपला झेंडा ही देशाची शान, सन्मान मानूया, आणि त्याला तसंच अदबीने हाताळूया.

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news