लवंगी मिरची : तांत्रिक अडचण

लवंगी मिरची : तांत्रिक अडचण
Published on
Updated on

बरेचदा आपण रस्त्यामध्ये एखादी एसटी बंद पडलेली आहे आणि सर्व प्रवासी आणि ड्रायव्हर, कंडक्टर माफ कर मित्रा, ड्रायव्हर नव्हे, ड्रायव्हर सोडून उपलब्ध असलेले सर्वजण ती एसटी ढकलताना पाहतो. काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला असतो. हायवेला पण तू पाहत असशील मित्रा की, भरधाव चालता चालता एखादी कार बंद पडते तिला बाजूला घेऊन मालक आणि आजूबाजूच्या परिसरातला मेकॅनिक काहीतरी खटपट करून ती सुरू करण्याचा प्रयत्न करत असतात. हे द़ृश्य आजकाल सर्वत्र पहायला मिळते; पण तुला गंमत सांगतो जी-20 परिषदेलाला आलेले कॅनडाचे अध्यक्ष असेच भारतामध्ये अडकून पडले.

अरे काय सांगतोस काय? म्हणजे त्यांच्या विमानाला पण धक्का मारायची वेळ आली की काय? आणि मग ते सध्या कुठे राहत आहेत?
हे बघ, तसं काही नाही, ते दिल्लीमध्येच थांबलेले आहेत. म्हणजे बघ झाले असे की, मोठ्या देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान हे अत्यंत शक्तिशाली व्यक्ती असतात. जगभरातील अतिरेक्यांकडून त्यांना आणि त्यांच्या जीवाला धोका असतो म्हणून ते स्वतःचे विमान घेऊन फिरत असतात. कॅनडाचे अध्यक्ष त्यांच्या देशाचे लष्कराचे विमान घेऊन जी- 20 परिषदेसाठी दिल्लीला येऊन पोहोचले खरे, पण परिषद सुरू असताना दरम्यान वैमानिकांच्या लक्षात आले की विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे.

अध्यक्षांचे प्रयाण ठरलेल्यावेळी होण्यापूर्वी तांत्रिक बिघाड काढण्याचा प्रयत्न त्यांनी भरपूर केला; पण तो काही निघाला नाही. मग, त्यासाठी कॅनडामधून दुसर्‍या विमानाने काही तंत्रज्ञ आले आणि ते तो बिघाड करण्याचा प्रयत्न करायला लागले. दरम्यान, अध्यक्षांचा सगळा कार्यक्रम बिघडला आणि त्यांना दिल्लीलाच थांबावे लागले. यावरून मी एक निष्कर्ष काढला आहे की, संसारामध्ये पत्नी, कार्यालयामध्ये साहेब आणि एखादे यंत्र यामध्ये कधी, कोणता बिघाड होईल, हे परमेश्वराला पण सांगता येत नाही.

तू म्हणतोस ते शंभर टक्के मला पटलेले आहे. आपण आनंदात घरी पोहोचतो, बायकोचे काहीतरी बिनसले असते. काय नेमका बिघाड आहे, हा आपल्याला कळत नाही. तो कळेपर्यंत तुमचे दोन दिवस निघून जातात. आपण कार्यालयीन कामकाज अत्यंत तत्परतेने करत असतो; पण एखाद्या दिवशी साहेबांचा मूड नसतो. कितीही चांगले काम केले, तरी साहेबांच्या शिव्या खाव्याच लागतात. साहेबांमध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड झालेला आहे कळत नाही. तसेच कॅनडाचे अध्यक्ष यांच्या विमानाचे झाले असावे.

पण, मी काय म्हणतो, प्रगत देशाच्या अध्यक्षांच्या विमानाचे असे काही होत असेल, असे जर काही आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे झाले असते, तर सगळ्यात मोठा गदारोळ आपल्याच देशातून उठला असता. शिवाय जगभरात आपले हसे आपल्याच लोकांनी करून दिले असते. कोणत्याही यंत्रामध्ये कधीही कोणताही बिघाड होऊ शकतो, हे समजून न घेता फक्त टीकेचा धुरळा उठला असता हे नक्की! अरे साधे उदाहरण घे!

एखादी नवीन कोरी शोरूमच्या बाहेर पडणारी कार असते आणि बाहेर पडल्यानंतर अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरामध्ये तिच्या टायरमध्ये एखादा खिळा घुसतो. या अशा बिघाडाला कोण काय करू शकणार आहे? कितीही मोठ्या माणसाची कार असेल, तरी त्याला आधी तो खिळा काढून, स्टेपनी बदलून किंवा त्या टायरचे पंक्चर काढून पुढे मार्गस्थ होणे आवश्यक आहे. याला काहीही पर्याय नसतो.
– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news