लवंगी मिरची : घरोघरी ज्ञानेश्‍वर?

लवंगी मिरची : घरोघरी ज्ञानेश्‍वर?
Published on
Updated on

घ्या. चांगला घसघशीत पेढा घ्या!
भलतेच खुशीत दिसताय.
मग? नातवाने पराक्रमच तसा केलाय. थेट 92 टक्के मार्क पटकावलेत.
कुठल्या परीक्षेत?

आय.सी.एस. ई.च्या दहावीत. तब्बल 92 टक्के.
ग्रेट. आमच्या शेजारच्या मुलाला 96 टक्के आहेत.
पण, सध्या याहून मोठे पेढे नाहीहेत बाजारात, तेव्हा तुम्ही आपला आमचाच पेढा गोड मानून घ्या!
घेऊ की! पेढा काय आम्ही अनोळखी माणसाकडून पण घेऊ, मटकावू.

काय हो हे मार्क? विचारावे त्याला नव्वद टक्क्यांच्या पुढेच! धो धो मार्क मिळवतात नाही आताची पोरं?
बघा ना! यांच्या टक्क्यांच्या मानाने आपण नुसते टक्केटोणपेच खाल्ले असं वाटतं, नाही?
संपूर्ण परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाला 99.99 टक्के आलेत म्हणे.

अगदीच 'ढ' दिसतोय. तो एक शतांश टक्‍का कुठे घालवलास म्हणावं? किती बरं हा बेजबाबदारपणा?
आमच्या शेजारच्याला इंग्रजी भाषा विषयात शंभरपैकी अठ्ठ्याण्णव आहेत, आता बोला!
बोलती बंदच की! भाषा विषयात एवढे मार्क कधी कोणी पाहिले असतील का?
मला तर इंग्रजीत दोन-तीन वर्षांमध्ये मिळून एवढे भरले असतील.

आपल्या पिढीत बहुतेकांचं स्टँडर्ड असं इतपतच होतं, नाही? आताची पोरं म्हणजे हुशारच!
हो तर. घराघरात ज्ञानेश्‍वरच जन्मल्येत जसे काही.
आपल्यासारख्यांच्या पोटी अशी कायच्या काय विद्वान मुलं कशी निपजली असतील, असा प्रश्‍न नाही पडत तुम्हाला?
नाही. मला पुढचे प्रश्‍न जास्त पडतात.
म्हणजे कुठले?
अहो, हे एवढाल्ले मार्क बघून या पोरांची डोकी चढणार नाहीत का?
कशी काय?
दोन प्रकारे. एक तर त्यांना वाटेल, आपण अगदी बृहस्पतीच आहोत.
तसं काय, कोणालाही वाटू शकतं.

ते वेगळं. परीक्षा म्हटली की, असेच कधी नव्वद, कधी पंचाण्णव टक्के आपले, आपला तो हक्‍कच आहे, असं धरून बसतील ना ती!
बसली तर बसली.
पण, पुढे एखाद्या परीक्षेत कमी मिळाले, तर स्वीकारता यायला हवं ना? नाहीतर पळून जाणं, जीव देणं असले जीवघेणे स्टंट करावेसे वाटायचे.
बघा ना! प्रत्येक रिझल्टनंतर पेपरात अशा जाहिराती येतातच. लवकर परत ये, आईने अन्‍नपाणी सोडलंय, बाबा रागवणार नाहीत, काय अन् काय!

हे एक टोक, नाहीतर मी कोणीतरी एवढा मोठ्ठा आहे की, मी मुळी कष्टाची किंवा आलतूफालतू कामं करणारच नाही असा रुबाब दुसरीकडे. शेवटी दोन्हीने नुकसान कोणाचं?
मुलांचं. त्यापेक्षाही जास्त पालकांचं.
मग काय, सगळ्या मुलांना साठ-पासष्ठ टक्क्यांवर रखडवत ठेवायचं का तुमच्या मते?
तेवढं नाही अगदी; पण उगाच आपण ज्ञानेश्‍वर असल्याचा भ्रम नकोसा वाटतो खरा! समोर येईल त्याला तोंड देण्याची तयारी ही खरी हुशारी!

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news