

काय रे, सुरू करायची का मुलाखत? प्रश्न काढून आणलेस ना सगळे? मागच्या वेळेला काही न ठरलेले नवीनच प्रश्न आले होते. त्यामुळे साफ गोंधळ उडाला होता. या वेळेला व्यवस्थित काळजी घेतली आहे ना?
होय मालक. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे प्रश्न काढले आहेत. या वेळेला गोंधळ उडणार नाही.
नाही, नाही. तुम्ही फक्त उत्तरे सांगायची आहेत. प्रश्न आपणच काढले, त्यांची उत्तरे पण आपणच काढली आहेत. शिवाय तुम्ही कुठे पॉज घ्यायचा, कुणावर तुटून पडायचे, हातवारे कसे करायचे याचेही व्यवस्थित प्लॅनिंग आपल्या मीडिया सेलने करून ठेवलेले आहे.
हो. पण, उत्तरे कोणी काढली आहेत? कारण, आपल्याकडे जेवढे बुद्धिमान आणि हुशार लोक होते त्यापैकी बरेचसे तिकडे गेलेले आहेत. उत्तरे व्यवस्थित काढ, नाही तर त्यावरून गदारोळ व्हायचा.
अजिबात काळजी करू नका मालक. तुम्ही मुलाखत देणार, अशी मी बातमी सोडून दिली तेव्हापासून राज्यातील जनता तुमची मुलाखत ऐकायला उत्सुक आहे, माफ करा, पाहायला उत्सुक आहे. तुमचा तो आवेश, राणाभीमदेवी थाटातील गर्जना, तो खंजीर, ती फितुरी, ते तोफांचे आवाज, तो तलवारींचा खणखणाट, ती मावळ्यांनी केलेली चढाई हे पाहिले की, जनतेला स्फुरण चढते.
ते ठीक आहे; पण मुलाखतीचा मुख्य अजेंडा काय आहे?
नवीन काही नाही महाराज! त्या देवाभाऊने राजकारण केले, आपले लोक फोडले म्हणून त्या सगळ्यांवर फितुरीचा आरोप करायचा आहे. नुकतेच घड्याळाचे काटे काढून घेऊन गेलेल्या दादांना मात्र कौतुकाने गौरवायचे आहे. बाकी सेंटरमध्ये आपले टार्गेट ठरलेले आहेत. तीच ती जोडगोळी. त्यांच्यावर आसूड ओढायचे आहेत; पण मालक, या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला एक आग्रह करणार आहे. तसे म्हणण्यापेक्षा राज्यातील जनतेच्या वतीने विनंती करणार आहे. तुमच्या रूपाने मराठी माणूस पंतप्रधान झालेला पाहायला आम्हाला फार आवडेल. राज्यामध्ये नव्हे, नव्हे देशामध्ये पंतप्रधानपदाला लायक व्यक्ती फक्त आपणच आहात, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. नितेशबाबू, ममतादेवी, वयोवृद्ध खर्गे यांच्यापेक्षा कार्यक्षमतेमध्ये तुम्ही अव्वल आहात. त्यामुळे तुम्हीच पंतप्रधानपदासाठी आदर्श उमेदवार आहात, असे मी या मुलाखतीमधून जाहीर करणार आहे. शिवाय गावागावातील आपल्या कार्यकर्त्यांनी तुम्हीच भावी पंतप्रधान असल्याचे बॅनर पण जागोजागी लावलेले आहेत. याची खबर थेट अमेरिकेत व्हाईट हाऊसपर्यंत गेल्यामुळे ज्यो बायडेन यांनीही तुमच्या विषयीची माहिती काढण्याचे आदेश त्यांच्या प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीचे तख्त तर गदागदा हलायला सुरुवात झाली आहे. सगळ्या वरिष्ठ नेत्यांना थरकाप सुटलेला असून केंद्रातील सगळे नेते आणि अवघे मंत्रिमंडळ घाबरून गेलेले आहे. मी नुसता मुलाखतीचा टीजर सोडला, तर ही परिस्थिती झाली. प्रत्यक्ष मुलाखत व्हायरल झाल्यावर संपूर्ण देशामध्ये तुमचाच जयजयकार होणार आहे मालक! उन्हाळा संपल्यानंतर शेतकरी ज्या असोशीने पावसाची वाट पाहत असतो तसेच संपूर्ण भारतातील जनता तुमच्या मुलाखतीकडे उत्सुकतेने पाहत आहे. इकडे-तिकडे गेलेले आपले जुने कार्यकर्ते मुलाखत प्रसिद्ध होताच सैरावैरा धावत आपल्याच चरणावर डोके ठेवणार आहेत. चल रे, कॅमेरा ऑन कर!