माझे गुरुवर्य प्रा. पां. ना. कुलकर्णी

माझे गुरुवर्य प्रा. पां. ना. कुलकर्णी

मराठीचे ज्ञानी उपासक, निष्ठावंत आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, एकनाथपूर्व ज्ञानेश्वरीची संहिता शोधणारे संशोधक, ज्ञानोपासक गुरुवर्य प्रा. पां. ना. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीची सांगता आज (मंगळवार) होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्याने त्यांना वाहिलेली आदरांजली…

राजाराम कॉलेजमधील प्राध्यापक आणि मला सांगायला आनंद वाटतो की, माझे मराठीचे गुरुवर्य प्रा. पां. ना. कुलकर्णी यांची ओळख मराठी साहित्यातील एक व्यासंगी संशोधक म्हणून सर्वांना आहे. प्राचीन हस्तलिखितांचा शोध घेणे आणि त्यांचे संपादन करणे यात त्यांनी आयुष्य व्यतीत केले. या संशोधनातूनच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या आजवरच्या उपलब्ध प्रतींमधील आद्य अशी प्रत मिळवली. दोन तपांच्या अथक संशोधनातून त्यांना ती प्राप्त झाली. शिवाजी विद्यापीठाने हे संशोधन ग्रंथरूपाने प्रकाशित केले. राजाराम महाविद्यालयात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना तळमळीने विद्यादान केलं. बेडकिहाळसारख्या लहानशा गावात सरांचे बालपण गेले. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. कुरुंदवाडमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरला राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. प्रचंड अभ्यासाच्या बळावर त्यांनी बी.ए. आणि

एम.ए.च्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. पुढे एक अभ्यासक, संशोधक अशी त्यांंनी स्वतःची जडणघडण केली. आयुष्यभर एखाद्या व्रताचा ध्यास घेऊन अखंडपणे काम कसे करावे, याचा आदर्श म्हणजे पां.ना. सर होत. सरांची सत्यनिष्ठा विलक्षण होती. गुणग्राहकता वाखाणण्याजोगी होती. व्यासंगाने आलेला दृढपणा त्यांच्यात होता. तीर्थक्षेत्रांविषयी आणि संतांविषयी त्यांना अपार आदर होता. ते शांत आणि समतोल वृत्तीचे होते. त्यांच्या वृत्तीचा समतोल आयुष्यभर कधी ढळला नाही.

प्रा. पां. ना. कुलकर्णी हे आम्हाला मराठी शिकवीत. त्यांची व्याख्याने विद्यार्थी कधीच चुकवीत नसत. त्यांच्या विषयाचं ज्ञानाचं भांडारच जणू त्यांच्याकडे असायचं. ते सारं 'भांडार' फोडून विद्यार्थ्यांवर उधळून टाकायचे. हातचं काही राखून ठेवत नसत. त्यामुळे त्यांच्या लेक्चर्सना किती घ्यावं नि किती नको, अशी गत होत असे. बुद्धीला चांगलं खाद्य मिळायचं. मेंदूची भूक भागायची.

माझी ज्ञानमंदिरं आणि त्यांचं माझ्या आयुष्यातलं स्थान मोजायचं झालं, तर सेंट झेव्हियर्स हा माझ्या शिक्षणाचा भक्कम पाया म्हणावा लागेल आणि त्या ज्ञानमंदिराच्या कळसावर झेंडा लावला, तो राजाराम महाविद्यालयानंच! कारण, महाविद्यालयात आल्यानंतरच शिक्षण हे शिकवून येत नसतं, तर आपण ते शिकून घ्यायचं असतं, हे मला कळून चुकलं आणि माझ्यात दिवसेंदिवस प्रगती होत गेली. शिकणं हा केवळ एक परिपाठ नसून तो 'आत्मसाक्षात्कार' आहे, हे मला हळूहळू समजू लागलं आणि प्रबुद्ध होण्याच्या दिशेनं माझी पावलं पडू लागली..!

सेंट झेव्हियर्समध्ये माझं मराठी लोअर होतं. तिथं बोलण्यापासून सगळंच इंग्रजीतून असल्यामुळे माझी मायबोली जी मराठी, तिलाच मी पारखा झालो होतो. मी ठरवलं की, आपल्याला 'पुढारी'ची धुरा सांभाळायची आहे, तर मराठीवर प्रभुत्व असलं पाहिजे. त्यामुळे मी प्री-डिग्रीला मराठी हा विषय मुद्दाम घेतला. त्यावेळी प्रा. अंबुजा सोनटक्के व प्रा. पां. ना. कुलकर्णी मराठीचे प्राध्यापक होते.

काहीही करून आपलं मराठी सुधारायचंच, असा मनाशी चंगच बांधला आणि आमचे मराठीचे प्राध्यापक पां. ना. कुलकर्णी यांची मी शिकवणी लावली. योगायोगानं ते शुक्रवार पेठेतच आमच्या घराजवळ राहात असत. त्यामुळे मी त्यांच्या घरीच जात असे. त्यांनी मला अनेक पुस्तकं वाचायला लावली. त्यांच्या सांगण्यावरूनच मी समग्र अत्रे वाचून काढलं. तसेच पु. ल. देशपांडे यांचं सर्व साहित्य वाचलं. मराठीतील बहुतेक मान्यवरांचं साहित्य वाचण्याचा मी सपाटाच लावला. पां. ना. कुलकर्णी सरांनी मला वाचनाची गोडी लावली. त्यामुळे माझी मराठी भाषा कमालीची सुधारली. मराठीवर प्रभुत्व आलं. 'पुढारी' हे तर मराठी वृत्तपत्र. साहजिकच बातम्या असोत किंवा लेख असू देत, नाहीतर अग्रलेख लिहायचा असूदे, यासाठी मराठीवर प्रभुत्व असणं आवश्यकच होतं. ते मला वेगवेगळे विषय देऊन निबंध लिहायला लावत. मी शाळेत असताना संस्कृत हा विषय घेतलेला असल्यामुळे मला मराठीवर प्रभुत्व मिळवायला सोपे गेले, हेही नमूद करणे आवश्यक आहे. सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये असताना माझा इंग्रजीचा पाया भक्कम केला तो फादर रॉबर्ट यांनी. त्यामुळे आम्ही त्यांना God of english literature म्हणत असू. तसेच मला प्रा. पां. ना. कुलकर्णी सर हे मराठी भाषेचे देवच होते, असेच म्हणावे वाटते.

वाचनाची सवय मला बालपणापासूनच लागली आणि पुढे राजाराम महाविद्यालयात आल्यानंतर तर माझ्यासाठी पुस्तकांचं एक नवीन जगच खुलं झालं. त्याला खर्‍या अर्थानं कारणीभूत ठरले ते आमचे मराठीचे सव्यसाची प्राध्यापक पां. ना. कुलकर्णी. त्यांनीच आम्हाला साहित्याची गोडी लावली. कादंबरी कशी वाचावी, नाटकांचं बलस्थान कशात असतं, कथांचा आशय कसा शोधावा, तसेच प्रवासवर्णन असो किंवा ऐतिहासिक लेखनाची सत्यता कशी पडताळून पाहावी, अशा गोष्टी त्यांनीच आम्हाला समजावून सांगितल्या. त्याचप्रमाणे सामाजिक लेखनाच्या विविध बाजूही त्यांनी आम्हाला उकलून दाखवल्या. हे दोन्ही प्राध्यापक म्हणजे ज्ञानाचं भांडार होते.

महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी पां. ना. सरांचे स्नेहाचे नाते होते. त्यांनी संपादित केलेल्या एकनाथपूर्वकालीन ज्ञानेश्वरीचा चिकित्सक अभ्यास व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. हा तर मोठमोठ्या अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. तसा अभ्यास अनेक अभ्यासकांनी केलाही. सरांना लहानपणापासून वाचनाची आवड होती, ती त्यांनी अतिशय काळजीपूर्वक जोपासली. त्यातूनच त्यांच्यातल्या संशोधकाची चांगली जडणघडण झाली. पां. ना. सरांच्या सहवासात येणार्‍या सर्वांना त्यांच्यातील सात्त्विक प्रसन्नतेचा अनुभव येई. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. मराठीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्यावर मोठा लोभ होता.

भाविक, पवित्र, सात्त्विक आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि सुसंस्कृत असलेल्या पां. ना. सरांचे आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात निर्वाण झाले. जीवनसागरामध्ये हेलकावणार्‍या अनेक विद्यार्थ्यांच्या जीवननौका सुखरूपपणे पैलतीरास लागाव्यात यासाठी तळमळणारा, त्यांना धीर, दिलासा देणारा एक आधारस्तंभ कोसळला. जीवनभर ज्ञानसाधनेत रमलेला ज्ञानोपासक, निष्ठावंत साधक हरपला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माझे त्यांना विनम्र अभिवादन..!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news