भलतीच पंचाईत झालीय बुवा!

भलतीच पंचाईत झालीय बुवा!
Published on
Updated on

काय म्हणतोस मित्रा कसा आहेस? चेहर्‍यावर तर बारा वाजलेले दिसत आहेत. अरे, काही नाही एक वेगळीच भानगड होऊन बसली होती. माझी मोटारसायकल नाही का म्हणजे ती दोन चाकी. ती चालवताना उगाच दोन-तीन वेळा डोके हलल्यासारखे झाले. अगदी चक्क दुचाकी पण चार-पाच फूट वेडीवाकडी चालली. मला थोडीशी व्हरटायगोची म्हणजे कारण नसताना चक्कर येणे याची शंका आली. स्पाँडीलायटीसपासून ते मेंदूच्या कँसरपर्यंत नाही नाही ते विचार मनात आले. संध्याकाळी स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेलो. त्यांनी बीपी वगैरे तपासले आणि डोळ्यापुढे अंधारी वगैरे आली होती काय आणि इतर जुजबी प्रश्न विचारले आणि काहीही झाले नाही, असा निर्वाळा देऊन वाटी लावले. पुन्हा तसे झाले तर टू डी इको, एमआरआय, एक्स-रे वगैरे करून घेऊयात म्हणाले.

न एव्हढ्याने थोडेच शांत होते? दोन-तीन दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडला आणि मग दिवसातून किमान दोनवेळा तसेच होऊ लागले. एकदा तर गाडी पडते की काय, अशी भीती पण वाटली. ईश्वरी इच्छेपुढे कुणाचे चालत नाही, अशी स्वतः ची समजूत घालून मी दैनंदिन व्यवहार तसेच सुरू ठेवले. दिवसभर डोक्यात 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे गाणे वाजत होते.

साधारण आठ दिवसांनंतर एके दिवशी दुचाकी पंचर झाली. हो, पंचरच, आपल्या गावात एकही गाडी, पंक्चर होत नाही. ते जाऊ दे, तर पंचरचे दुकान समोरच होते आणि कुणी कारागीर तिथे मन लावून काम करत होता. माझ्या गाडीकडे वळून त्याने चाक काढण्यासाठी पान्हा लावला आणि चक्क माझ्यावर तो ओरडलाच!

'कैसे गाडी चलारे जी साब, टैरा पुरे टकला हुये है, झकोले मार रही हुंगी गाडी अपने रोडापर, गिर जायेंगे एखाद दिन. दोनो टायरा बदलना पडते देखो. हौर ये डिस्का? अबोबबो, ये तो पुरेच गये वाले है जी. झकोला मारके अभितक गिरे नाही ये तो तकदिर है तुम्हारी. जाओ साब, दो टायरा हौर दो डिस्का लेको आवो, वो भी ट्यूब वाले. अपने गांव के रोडा टायरा खाते जी!'

माझ्या डोळ्यापुढे लक्ख प्रकाश पडला. काहीही झालेले नाही, असे अचूक निदान करणारे डॉक्टर एमडी, डीएनबी होते; पण मीही त्या पंचर काढणार्‍या कारागिराला त्याच्या निदानासाठी मनातल्या मनात पदवी देऊन टाकली. त्याचेही निदान तितकेच अचूक होते. टायर बदलले आणि तुला सांगतो, नंतर ना कधी मी हल्लो ना कधी दुचाकी हलली.

म्हणजे आपल्या गावातील रस्त्यांची दुर्दशा म्हणजे अगदी चाळण झालेली आहे. तरीपण गाडीच्या डॉक्टरकडे जाण्यापूर्वी गाडीचे टायर तपासून घेतले पाहिजेत, होय की नाही मित्रा? आणखी एक सांगतो रस्ते खराब म्हणजे गावावर धुळीचे ढगच असतात. नशीब, आपल्या गावात विमानतळ नाहीये ते. नाहीतर उतरणार्‍या विमानांना गाव दिसलेच नसते आणि ते भरकटत राहिले असते आणि मोठ्या दुर्घटनेलाच आमंत्रण मिळाले असते बघ!

खरे आहे, विमानाचे सोड आता आपल्या साध्या दुचाकी, चारचाकीही रस्त्यावरून चालवणे अवघड होऊन बसले आहे, गाडी पंचर झाल्यानंतर तातडीने पंचरवाला मिळणेही अवघड झाले आहे, मित्रा!

अरे मित्रा पंचरचे काम करणे कमीपणाचे मानले जाते, त्यामुळे हल्ली बेरोजगार तरुण घरात बसून आयते घातील; पण असला धंदा करणार नाहीत आणि घरच्यांवर मात्र भार बनून जातील!
होय खरे आहे, साला खूपच वांदा झालाय बघ!

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news